कोल्हापूर, ७ जानेवारी (वार्ता.) – जुलै २०२४ मध्ये विशाळगडप्रकरणी उसळलेल्या उद्रेकानंतर हा गड प्रशासनाने पर्यटक, तसेच अन्य जनता यांसाठी बंद केला होता. आता ५ मासानंतर प्रशासनाने आदेश काढून विविध अटींचे पालन करत ३१ जानेवारीअखेर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हा गड पर्यटक, तेथील दर्गा, तसेच तेथील मंदिरात असलेल्या देवतांच्या दर्शनासाठी खुला केला आहे. पोलीस प्रशासनाने गडावर जाणार्या व्यक्तींची पडताळणी करूनच गडावर जाण्यास अनुमती द्यावी, तसेच सायंकाळी ५ नंतर कुणासही गडावर थांबता येणार नाही, असे शाहूवाडी तहसीलदारांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे गडावर कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ घेऊन जाता येणार नाही, तसेच शिजवून खाता येणार नाही. गडावर ३७ (१) (३) कलम लागू करण्यात आले असून कोणत्या संघटनेस कोणत्याही प्रकारचा धार्मिक अथवा अन्य कार्यक्रम करावयाचा असल्यास शाहूवाडी पोलीस निरीक्षकांची अनुमती, तसेच इतर स्थानिक अनुमती घ्यावी लागेल. या अनुमती घेतल्याविना त्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही, असेही तहसीलदारांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
याविषयी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने निवेदन देऊन विशाळगडावर ५० हून अधिक अतिक्रमणे असून ही काढल्यावरच गड खुला करावा, असे म्हटले होते.