‘कुंभमेळा’ याविषयीची शास्त्रीय माहिती

‘१३.१.२०२५ ते २६.२.२०२५ या कालावधीत प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि अदृश्य स्वरूपात असलेली सरस्वती या नद्यांच्या संगमावर महाकुंभमेळा आहे. 

१. ‘कुंभमेळा’ या शब्दाचा अर्थ 

संस्कृतमध्ये ‘कुंभ’ या शब्दाचा अर्थ घडा किंवा घट किंवा कलश, तर ‘मेळा’ या शब्दाचा अर्थ ‘यात्रा’ असा आहे. हिंदु संस्कृतीमध्ये कुंभ, घट किंवा कलश यांच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. कलशपूजनाच्या वेळी पुढील मंत्राचे उच्चारण केले जाते.

‘कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः ।
मूले त्वस्य स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ।।
कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ।
ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः ।
अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः ।।

अर्थ : कलशाच्या मुखात श्रीविष्णु, कंठात रुद्र, मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी सर्व मातृगण, कुक्षीमध्ये सात समुद्र आणि सात द्वीपांनी युक्त अशी पृथ्वी सामावलेली आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे वेद त्यांच्या अंगांसह कलशात वास करतात.

२. कुंभमेळ्याची ज्योतिषशास्त्रीय माहिती 

‘देव-दानव यांनी समुद्रमंथन केले. तेव्हा समुद्रातून अनेक रत्नांसमवेत अमृतकुंभही मिळाला. हा अमृतकुंभ सुरक्षितपणे स्वर्गात पोचवण्याचे दायित्व इंद्राचा पुत्र जयंत याच्यावर सोपवण्यात आले. सूर्य, चंद्र आणि गुरु त्याच्या साहाय्याला होते. अमृतकुंभ स्वर्गात नेत असतांना दैत्यांनी चार वेळा आक्रमण करून तो कुंभ मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या चारही वेळी तो कुंभ पृथ्वीवर ठेवून देवांनी दैत्यांचा प्रतिकार केला. त्या वेळी पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी देवांनी तो अमृतकुंभ ठेवला, त्या चार ठिकाणी नद्यांच्या तिरांवर कुंभमेळा भरतो. ती चार ठिकाणे हरिद्वार, प्रयागराज, त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन ही आहेत. या चार ठिकाणी ज्या ज्या राशीमध्ये गुरु असतांना कुंभ ठेवला गेला, त्या त्या राशीमध्ये गुरु आला म्हणजे त्या ठिकाणी कुंभमेळा होतो. कुंभ राशीत ‘गुरु’ असता हरिद्वारला, वृषभ राशीत गुरु असता प्रयागराजला, सिंह राशीत गुरु असता त्र्यंबकेश्वर येथे, तसेच गुरु सिंह राशीत; परंतु मेषेचा सूर्य, तुळेचा चंद्र आणि वैशाख पौर्णिमा असतांना उज्जैन येथे कुंभमेळा असतो.’ (संदर्भ ग्रंथ : ‘कालसुसंगत आचारधर्म’, प्रकाशक : श्री. अनंत (मोहन) धुंडिराज दाते)

३. कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व 

कुंभपर्व हे अतिशय पुण्यकारक असल्यामुळे त्या वेळी स्नानाला विशेष महत्त्व आहे. हरिद्वार येथे गंगा नदीच्या तिरावर, प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि अदृश्य स्वरूपात असलेली सरस्वती या नद्यांच्या संगमावर, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या तिरावर, तर उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या तिरावर कुंभपर्वात स्नान करतात. कुंभपर्वात तीर्थक्षेत्री स्नान केल्याने पापक्षालन होऊन पुण्यफळ प्राप्त होते. कुंभमेळ्यात भारतातील विविध पिठांचे शंकराचार्य, विविध आखाड्यांचे साधू, महामंडलेश्वर, शैव आणि वैष्णव सांप्रदायिक, अनेक विद्वान, संन्यासी, संत-महात्मे एकत्र येतात. यामुळे भाविकांना सत्संगाचा लाभ होतो. ‘कुंभपर्वात केलेले स्नान, दान आणि श्राद्धकर्म विशेष फलदायी ठरते’, असे मानले जाते.

४. महाकुंभमेळा २०२५ मधील राजयोगी स्नानाचे (शाही स्नानाचे) दिवस

कुंभपर्व हे अतिशय पुण्यकारक असल्यामुळे त्या वेळी स्नानाला विशेष महत्त्व आहे. कुंभमेळ्याच्या प्रारंभी ठराविक दिवशी संत आणि त्यांचे शिष्य किंवा आखाड्याचे तपस्वी यांच्या स्नानाला राजयोगी स्नान (शाही स्नान) म्हणतात. या वर्षी महाकुंभमेळा २०२५ मधील राजयोगी स्नानांचे दिवस पुढीलप्रमाणे आहेत.

अ. पहिले राजयोगी स्नान : १३ जानेवारी २०२५, पौष पौर्णिमा

आ. दुसरे राजयोगी स्नान : १४ जानेवारी २०२५, मकर संक्रांत

इ. तिसरे राजयोगी स्नान : २९ जानेवारी २०२५, पौष अमावास्या (मौनी अमावास्या)

ई. चौथे राजयोगी स्नान : २ फेब्रुवारी २०२५, वसंत पंचमी

उ. पाचवे राजयोगी स्नान : १२ फेब्रुवारी २०२५, माघ पौर्णिमा

ऊ. सहावे राजयोगी स्नान : २६ फेब्रुवारी २०२५ महाशिवरात्री

 ५. कुंभमेळ्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व 

ज्योतिषशास्त्रात सूर्य (रवि) यास आत्माकारक, चंद्र ग्रह मनाचा कारक आणि गुरु ग्रह ज्ञानाचा कारक अन् ‘देवांचा गुरु’ मानले आहे. गुरु ग्रहाला १२ राशींमध्ये भ्रमण करण्यासाठी १२ वर्षे लागतात. गुरु ग्रहाच्या विविध राशींमधील प्रवेशानुसार चार ठिकाणी प्रत्येक १२ वर्षांनी कुंभमेळा होतो. या वर्षी १४.५.२०२५ दिवसापर्यंत गुरु ग्रह वृषभ राशीत आहे. १४.१.२०२५ या दिवशी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनंतर रवि ग्रहाचा मकर राशीत प्रवेश होणार आहे. या वर्षी १३.१.२०२५ या दिवसापासून २६.२.२०२५ या दिवसापर्यंत ‘प्रयागराज कुंभपर्वा’ला प्रारंभ होणार आहे.’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१.१.२०२५)