सहस्रो वर्षांचा इतिहास आणि परंपरा असलेल्या हिंदु धर्माला जगात जो मान आहे तो त्याच्यातील महान आणि मानवतावादी तत्त्वज्ञानामुळे. इतर धर्म ज्याप्रमाणे एकच ईश्वर मानतात तद्वत् आपण हिंदूही ईश्वर एकच मानतो. भेद एवढाच की, आपण त्याला वेगवेगळ्या रूपात पहातो. कुणी त्याला राम, तर कुणी कृष्ण म्हणतात, तर कुणी इतर काही. ही झाली मानवी रूपे. त्याही पलीकडे जाऊन आपण त्याला चराचरात पहातो. वनस्पती, प्राणी यांमध्ये तर तो आहेच; पण दगडांमध्येही आपणाला तो दिसतो. झाडांची आणि प्राण्यांचीही पूजा करणारा आपला धर्म. निसर्गाशी एकरूप झालेला किंबहुना निसर्गातूनच जन्माला आलेला हिंदु धर्म. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश या पंचमहाभूतांना देवता मानून त्यांची पूजा आपण करतो. ऋतुमानाप्रमाणे आपण वर्षभर अनेक सण साजरे करतो. देवाच्या पूजेतून आणि सण साजरे करण्यातून आपल्याला अपार आनंद अन् समाधान मिळते. हिंदु धर्म असा उत्सवांमधून सर्व समाजामध्ये आनंद आणि सुखसमाधान पसरवतो.
मुख्य धर्मपिठांनी धर्मशिक्षणाचा समान अभ्यासक्रम सिद्ध करून त्याची कार्यवाही करणे आवश्यक !
आद्यशंकराचार्यांनी भारताच्या चारही दिशांना ४ धर्मपीठे स्थापन केली; परंतु आज ही पीठे आणि त्यांची उपपीठे फारशी कार्यरत असल्याचे दिसत नाही. वास्तविक हिंदु धर्मरक्षणाचे आणि धर्मप्रसाराचे कार्य त्यांच्या माध्यमातून व्हावयास हवे होते. सर्वांना धर्मशिक्षण मिळावे, याकरता त्यांनीच व्यवस्था करावयास हवी होती. आता जी व्यवस्था आहे, ती ब्राह्मणांपुरती मर्यादित आहे आणि तीही मुख्यत्वे पौरोहित्य सांभाळण्यापुरती ! आज आवश्यकता आहे ती सर्व हिंदूना एकत्र आणण्याची आणि त्यांना धार्मिक शिक्षण देण्याची. त्यासाठी सर्व हिंदूंसाठी एकच समान अभ्यासक्रम सिद्ध करून त्याची कार्यवाही करायला हवी. आज असे शिक्षण मिळवण्यास हिंदू उत्सुक आहेत. यासाठी अभ्यासक्रम सिद्ध करणे आणि तो विविध स्तरांतून कार्यवाहीत आणणे, हे दायित्व आमच्या मुख्य धर्मपीठांचे आहे. येथे नम्रतापूर्वक म्हणावेसे वाटते की, त्यांनी ती स्वीकारावयास हवी. इतर धर्मांचे कार्य पहाता धर्मशिक्षण, धर्मरक्षण आणि धर्मप्रसार यांविषयी हिंदु धर्मगुरु कमी पडतात, असे वाटते. – श्री. गो.रा. ढवळीकर
१. संपूर्ण मानवजातीचा उदात्त विचार करणारा हिंदु धर्म !
आपल्याला मिळणार्या आनंदावर समाधान मानण्यापुरते आपले तत्त्वज्ञान संकुचित नसून ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ।।’ (अर्थ : सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. सर्वजण एकमेकांचे कल्याण पाहोत. कुणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो.), सर्व मानवजातीच्या कल्याणाचा उदात्त विचार त्यामध्ये आहे. ‘हिंदूंनाच सुख शांती मिळो अथवा हिंदु धर्मात आला, तरच आपल्याला सुख मिळेल किंवा हिंदु झाला, तरच आपल्याला मोक्ष मिळेल’, असे आपले तत्त्वज्ञान सांगत नाही आणि त्यासाठी धर्मांतराचा आग्रहही धरत नाही. इतर अनेक धर्मांचे प्रचारक ‘आपलेच तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे’, असे सांगून, आमिषे दाखवून, फसवणूक करून, तर कधी बळजोरी करून इतरांवर आपला धर्म लादण्याचा प्रयत्न करतात. अशा पार्श्वभूमीवर कुणावरही बळजोरी न करणारा आणि विविधतेत एकता पहाणारा दुसरा धर्म नसेल.
‘आक्रमण’ हा शब्दच आमच्या कोशात नाही. ‘जगा आणि इतरांना जगू द्या’, अशी हिंदूंची उदार वृत्ती आहे अन् याही पलीकडे जाऊन ‘हे विश्वचि माझे घर’ मानावयाची उच्च कोटीची शिकवण हिंदु धर्म आपल्या अनुयायांना देतो. ‘या जगात रहाणारे सर्व जण माझे बंधू आणि भगिनी आहेत’, या भावनेने या जगावर प्रेम करावयास तो सांगतो. या सर्वोच्च तत्त्वज्ञानाच्याच आधारे भारताचे पंतप्रधान मोदी जेव्हा जगाला ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर’ (एक भूमी, एक कुटुंब, एक भविष्य), हा संदेश देतात, तेव्हा जगातील मोठमोठे तत्त्ववेत्ते विचारवंत आणि सत्ताधीश भारावून जातात.
२. जातीभेदरूपी लागलेला कलंक पुसण्याची आवश्यकता
आपला हिंदु धर्म आणि संस्कृती इतकी सुंदर आदर्श अन् जगाला भारावून टाकणारी असतांना तो धर्म आणि संस्कृती, जातीभेद अन् उच्चनीचता यांच्या भावनांनी दुसर्या बाजूने काळवंडली जावी, हे खरोखरच दुर्दैव आहे. आपल्या धर्माला हे ग्रहण कधी लागले कोण जाणे; परंतु अनेक संत-महंतांनी आणि समाजसुधारकांनी पुष्कळ प्रयत्न करूनही धर्माला लागलेला हा कलंक अद्याप पुसला गेलेला नाही. समाज जसजसा शिक्षित होईल, तसे जातीभेद नष्ट होतील, असे वाटले होते; परंतु दिवसेंदिवस जाती-जातींमधील दरी अधिकच रुंदावत चालली आहे कि काय, असे वाटते. उच्च आणि उदात्त तत्वज्ञानावर उभारलेला हिंदु समाज कालांतराने जातीपातीत आणि उच्चनीचतेच्या कल्पनांनी कसा विभागला गेला, हे समजणे जरी शक्य नसले, तरी आताप्रमाणेच ‘फोडा आणि राज्य करा’, या राजसूत्राचा वापर करून आपल्या स्वार्थासाठी धर्मसत्तेने अथवा राजसत्तेने हे भेदाभेद जन्माला घातले असावेत, असे मानण्यास वाव आहे. राजकारणी लोक या भेदाभेदांचा वापर आपल्या लाभासाठी कसा करतात, हे आपण पहातच आहोत.
३. हिंदूंमध्ये एकी न राहिल्याने परधर्मियांकडून आक्रमणे
हिंदु धर्मातील लोक जातीपातीत विभागले गेल्यामुळे त्यांच्यात एकी राहिली नाही. परिणामी हिंदुस्थानवर आक्रमणे होऊन शेकडो वर्षे परकीय सत्तेखाली भरडला गेला. आक्रमकांनी मंदिरे नष्ट केली, देवतांच्या मूर्ती फोडल्या, हिंदूंना बाटवले आणि अनेक प्रकारे अत्याचार केले. हिंदूंची समृद्ध, संपन्न आणि सुंदर संस्कृती उध्वस्त केली. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतरच त्या विध्वंसाला आळा बसला. अन्यथा देशाचे काय झाले असते, याची कल्पनाच करवत नाही.
४. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नसल्याने त्यांच्यात जागृती निर्माण करण्यात अपयश येणे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात आणि नंतरही अनेक साधूसंत, समाजसुधारक यांनी हिंदूंमध्ये जागृती करण्याचे आणि जातीभेद नष्ट करण्याकरता प्रयत्न केले. आताही अनेक संतमहंत, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसारख्या इतरही अनेक संस्था हिंदूंना एकत्र आणण्यासाठी कार्य करत आहेत; परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत असल्याचे दिसत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे सर्व हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याची व्यवस्था नाही. सनातन संस्थेसारख्या काही संस्था या दृष्टीने प्रयत्नरत आहेत; परंतु ते सार्वत्रिक झालेले नाही.
५. हिंदूंवर व्रतबंध संस्कार करून एक वर्ष धर्मशिक्षण देणे महत्त्वाचे !
धर्मशिक्षणाचा प्रारंभ व्रतबंध संस्कारांनी, म्हणजेच मौजी बंधनाने झाली पाहिजे. ८ वर्षे वय झाल्यानंतर प्रत्येक मुलाचे आणि मुलीचे मौजीबंधन झाले पाहिजे अन् त्यांना न्यूनतम १ वर्ष धर्मशिक्षण दिले पाहिजे. यामुळे धार्मिक मूलतत्त्वांचा त्यांना परिचय होईल, तसेच हिंदु धर्म आणि संस्कृती श्रेष्ठ आहे, हे समजून आल्यानंतर त्यांच्यात सार्थ अभिमान निर्माण होईल. धार्मिकदृष्ट्या सर्वांना एकाच पातळीवर आणल्याने भेदाभेद नष्ट होण्यास साहाय्य होईल.
६. हिंदु पीठाधीशांनी पुढाकार घेऊन समाजात पालट घडवण्यासाठी धर्मजागृती करायला हवी !
आपल्यापैकी काही लोकांना विशेषतः रूढीग्रस्त लोकांना वरील विचार अप्रस्तुत वाटण्याचा संभव आहे; परंतु या विचारात नवीन काहीच नाही. ज्या गोष्टी आपण विसरत आहोत, त्याची केवळ ही आठवण आहे. पूर्वी सर्वांच्या मुंजी केल्या जात आणि त्यानंतर ते ऋषिमुनींकडे शिक्षणासाठी जात असत. प्रारंभीला जीवनावश्यक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या ज्ञानशाखेकडे अथवा व्यावसायिक शिक्षणाकडे वळत असे. काही जण शास्त्रांचे, तर काही शस्त्रांचे, काही जण शेतीचे, तर काही इतर व्यवसायांचे शिक्षण घेत. माझ्या दृष्टीने शूद्र ही जात नव्हती. जन्माला येणारा प्रत्येक माणूस शूद्र, म्हणजे संस्कारहीन असतो. संस्कार झाल्यानंतर तो विद्वान, तज्ञ होतो. तेव्हा शूद्र ही जात नसून माणसाची जन्मानंतरची अवस्था आहे. त्यामुळेच वयाच्या ८ ते १० वर्षे या कालावधीत प्रत्येक मुलाचे मौजीबंधन आणि त्यानंतरचे धार्मिक शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सध्या कोणतीच बंधने नसल्याने हिंदु समाजात जो बेशिस्तपणा दिसून येतो, त्याला आळा बसेल. असे कार्य गेली अनेक वर्षे गोव्यात कुंडई येथील तपोभूमीत तेथील पीठाधीश सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे, हे पाहून पुष्कळ आनंद वाटतो. ही व्यवस्था आमच्या सर्व धर्मगुरूंनी अंगीकारावी आणि समाजात कालानुरूप पालट घडवून आणावा. यामध्ये आमच्या चारही पीठाधीशांनी पुढाकार घ्यावा.
– श्री. गो.रा. ढवळीकर, फोंडा, गोवा.