यज्ञातून प्रक्षेपित होणारी सकारात्मकता ग्रहण करण्यासाठी सात्त्विक जीवनशैली अवलंबणे आणि साधना करणे आवश्यक ! – शॉन क्लार्क

  • महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने नवी देहली येथे यज्ञविषयक संशोधन सादर !

  • महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे आहेत सहलेखक !

श्री. शॉन क्लार्क

फोंडा (गोवा) – ‘सध्या जगभरातील वायुमंडलात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ‘न भूतो न भविष्यति’ एवढे वाढले आहे, हे अत्यंत चिंतेचे कारण आहे’, असे हवामान शास्त्रज्ञ सांगत आहेत; मात्र त्याही पेक्षा अधिक काळजीचे कारण ‘सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक प्रददूषणात, म्हणजे रज-तम यांत झालेली वाढ’, हे आहे. यज्ञामुळे वायुमंडलातील रज-तमाचे प्रदूषण न्यून होते, हे विविध वैज्ञानिक प्रयोगांतून स्पष्ट झाले आहे. ‘यज्ञातून प्रक्षेपित होणारी सकारात्मकता ग्रहण करणे आणि ती टिकवून ठेवणे यांसाठी सात्त्विक जीवनशैली अवलंबणे अन् साधना करणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी केले. नुकतेच नवी देहली येथे झालेल्या ‘ट्वेंटिसेवेंथ इंडिया कॉन्फरन्स ऑफ वेव्हज ऑन मॅन अँड नेचर इन वेदिक ट्रेडिशन : मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह’ या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. त्यांनी ‘यज्ञामधील वायुमंडलाची आध्यात्मिक शुद्धी करण्याची क्षमता’, हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे लेखक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे असून सहलेखक श्री. क्लार्क आहेत.

१. श्री. क्लार्क यांनी शोधनिबंध सादर करतांना जानेवारी २०२२ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात केल्या गेलेल्या ६ यज्ञांचा आध्यात्मिक स्तरावर होणार्‍या लाभांचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या माती, पाणी आणि वायु यांच्या वैज्ञानिक चाचण्यांचे निष्कर्ष मांडले.

२. या चाचण्यांसाठी यज्ञापूर्वी आणि यज्ञानंतर माती, पाणी अन् वायु यांचे नमुने गोळा करतांना ते साधना करणार्‍या साधकांच्या घरातील, तसेच त्यांच्या शेजारी साधना न करणार्‍या घरातील, असे जोडीने घेण्यात आले.

३. या तिन्ही प्रकारच्या नमुन्यांमधील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या मापनासाठी ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाचा वापर करण्यात आला. ‘यज्ञामुळे नकारात्मक ऊर्जा न्यून होणे, तर सकारात्मक ऊर्जा वाढणे’, असा परिणाम दोन्ही घरांतील तिन्ही प्रकारच्या नमुन्यांविषयी दिसून आला. साधकांच्या घरांतील नमुन्यांमध्ये हा परिणाम अधिक प्रमाणात आढळला; कारण साधना केल्यामुळे घरातील नकारात्मकता न्यून होते, तसेच सकारात्मकता आणि बाह्य सकारात्मकता ग्रहण करण्याची क्षमताही वाढते.

४. श्री. क्लार्क पुढे म्हणाले की, यज्ञाचा परिणाम यज्ञस्थळापासून सहस्रो किलोमीटर दूर असलेल्या भागांवरही होतो, हे यज्ञस्थळापासून विविध अंतरांवर असलेल्या ठिकाणांहून घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीत आढळले. एवढेच नाही, तर यज्ञाचा सकारात्मक परिणाम यज्ञ झाल्यानंतर पुढेही काही काळ टिकून रहातो.

मृत्यूनंतर माणसासह केवळ धर्म येणे

यक्षाने युधिष्ठिराला जे १०० प्रश्न विचारले त्यात एक प्रश्न आहे, ‘मृत्यूनंतर माणसाच्या समवेत कोण येतो ?’ त्याचे धर्मराजाने उत्तर दिले, ‘मृत्यूनंतर माणसासह धर्म येतो. ‘धर्माे मित्रं मृतस्य ।’ (चाणक्यनीती, अध्याय ५, श्लोक १५) म्हणजे ‘मेलेल्या माणसाचा धर्म हाच मित्र आहे.’

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.