आम्ही माऊलीच्या लेकी, वर्णू जयंत थोरवी ।

सौ. शुभांगी शेळके यांना पारंपरिक फेराच्या गीतावर आधारित स्फुरलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्तुतीगीत !

‘गुरुमाऊलींचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा) अद्वितीय आणि अलौकिक रथोत्सव सोहळा पाहून माझे मन भारावून गेले. ‘रथोत्सवात नृत्यसेवा करणार्‍या सर्व साधिकांपैकी मीही एक आहे आणि आम्ही सर्व जणी फेर धरून पारंपरिक फेराचे नृत्य करत गीत म्हणत आहोत’, असे मला वाटले. त्या वेळी माऊलींच्या स्तुतीचा अनाहतनाद फेराच्या गीताच्या माध्यमातून माझ्या मनात अखंड उमटत राहिला. ते गीत पुढे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पहिली सखी : चला, चला गं सयांनो, गाऊ माऊलींची ओवी ।
आम्ही माऊलीच्या लेकी,
वर्णू जयंत थोरवी ।। धृ. ।।

सौ. शुभांगी शेळके

दुसरी सखी : माऊली कशी ? माऊली कशी ? माऊली कशी ?

तिसरी सखी : कशी, कशी, कशी ?

पहिली सखी : माझ्या गुरुमाऊलींचे रूप, सये साध गं साजिरं ।
ओवाळून गं टाकिते, जिवाचं गं लिंबलोण ।
कोटी सूर्यांचे गं तेज, नेत्रांतूनी वाहे प्रीती ।।

सर्व जणी : चला, चला गं सयांनो, गाऊ माऊलींची ओवी ।
आम्ही माऊलीच्या लेकी, वर्णू जयंत-थोरवी ।।

दुसरी सखी : माऊली कशी, बाई माऊली कशी ?

तिसरी सखी : कशी, कशी, कशी ?

पहिली सखी : माझ्या माऊलीची दृष्टी, नित प्रेमाची गं वृष्टी ।
माझ्या माऊलीची दृष्टी, नित अमृताची वृष्टी ।
कोटी कोटी जन्मांचे गं, माझे प्रारब्ध जाळती ।।

सर्व जणी : चला, चला गं सयांनो, गाऊ माऊलींची ओवी ।
आम्ही माऊलीच्या लेकी, वर्णू जयंत थोरवी ।।

दुसरी सखी : माऊली कशी, बाई माऊली कशी ?

तिसरी सखी : कशी, कशी, कशी ?

दुसरी सखी : माझ्या माऊलीच्या वाणीत, सरस्वती गं विलसे ।
तत्त्व आकाशाचा नाद, देवभाषा गं बरसे ।
रत्नजडित गं शब्द, हृदयमंदिरी साठती ।।

सर्व जणी : चला, चला गं सयांनो, गाऊ माऊलींची ओवी ।
आम्ही माऊलीच्या लेकी, वर्णू जयंत-थोरवी ।।

दुसरी सखी : माऊली कशी, बाई माऊली कशी ?

तिसरी सखी : कशी, कशी, कशी ?

पहिली सखी : माझ्या माऊलीचे हास्य,
खळखळ नितळ पाण्याचे ।
माझ्या माऊलीचे स्मित, मंजुळ निखळ झर्‍याचे ।
मनमंदिरी गं माझ्या, नित चैतन्य भरती ।।

सर्व जणी : चला, चला गं सयांनो, गाऊ माऊलींची ओवी ।
आम्ही माऊलीच्या लेकी, वर्णू जयंत-थोरवी ।।

दुसरी सखी : माऊली कशी, बाई माऊली कशी ?

तिसरी सखी : कशी, कशी, कशी ?

पहिली सखी : माऊलीचे श्री चरण, अवघे ब्रह्मांड व्यापती ।
माऊलीचे श्री चरण, भक्त नित गं पूजती ।
माऊलीचे श्री चरण, जिथे जिथे गं पडती ।
तिथे तिथे अवघी सृष्टी, क्षणमात्रे उद्धरती ।।

सर्व जणी : चला, चला गं सयांनो, गाऊ माऊलींची ओवी ।
आम्ही माऊलीच्या लेकी, वर्णू जयंत-थोरवी ।।

दुसरी सखी : माऊली कशी, बाई माऊली कशी ?

तिसरी सखी : कशी, कशी, कशी ?

पहिली सखी : माऊलीचे गं हृदय, ब्रह्मांडासम विशाल ।
माऊलीचे गं हृदय, आदि-अंत नाही त्यासी ।
सांग सांग माझ्या सये, काय दिसते गं त्यात ।
हिंदु राष्ट्र दिसे त्यात, साधक-संत गं रहाती ।।

सर्व जणी : चला, चला गं सयांनो, गाऊ माऊलींची ओवी ।
आम्ही माऊलीच्या लेकी, वर्णू जयंत-थोरवी ।।

दुसरी सखी : माऊली कशी, बाई माऊली कशी ?

तिसरी सखी : कशी, कशी, कशी ?

पहिली सखी : माऊली वत्सले, तू धेनु, मी गं वासरू अजाण ।
क्षमा अपराधी मी, आई तुझ्या चरणांशी येई ।
तूची सोडोनिया पान्हा, तूची ओवी ही गायिली ।
तूची ओवी ही गायिली, ऐसे माय गं माऊली ।।’

– सौ. शुभांगी शेळके (एम्.ए. नाट्यशास्त्र), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक