संस्‍कृत भाषेचे सौंदर्य

क्षणाक्षणाचे मोल

न हि कश्‍चिद़् विजानाति किं कस्‍य श्‍वो भवेदिति ।
अतः श्‍वः करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान् ॥

अर्थ : उद्या कुणाचे काय होईल, हे कुणालाही कळत नाही; म्‍हणून बुद्धीमान माणसाने उद्या करावयाची कामे आजच करावीत.

इतरांचे दोष नको, गुण पहा !

दृष्‍टं किमपि लोकेऽस्‍मिन् न निर्दोषं न निर्गुणम् ।
आवृणुध्‍वमतो दोषान् विवृणुध्‍वमतो गुणान् ॥

अर्थ : दोष नसलेली किंवा गुण नसलेली एक तरी गोष्‍ट या जगात दिसते का ?; म्‍हणून लोकांचे दोष झाकून ठेवा आणि गुण दाखवा.

आळसामुळेे संकटे ओढवणेे

शाखायां सुखमासीनः सलीलं विध्‍यते खगः ।
उत्‍पतत् तु अनपायः स्‍याद़् अनुद्योगो भयावहः ॥

अर्थ : झाडाच्‍या फांदीवर सुखाने बसलेला पक्षी सहज मारला जातो. उडणार्‍या पक्ष्याला अपाय होत नाही. त्‍याचप्रमाणे आळसात बसणे, ही भयंकर गोष्‍ट आहे.

धैर्याने वागण्‍याचे महत्त्व

त्‍याज्‍यं न धैर्यं विधुरेऽपि दैवेे धैर्यात्‍कदाचित् स्‍थितिमाप्‍नुयात्‍सः ।

अर्थ : ‘विधुर’ म्‍हणजे वाईट. ‘स्‍थिति’ म्‍हणजे मार्ग किंवा उपाय. दैव विरुद्ध असले, तरी माणसाने धैर्य सोडू नये; धैर्यामुळे कदाचित् रक्षणाचा उपाय मिळू शकेल.

‘संस्‍कृत’ राष्‍ट्रीय भाषा व्‍हावी !

भारतात बर्‍याच ठिकाणी संस्‍कृतचा प्रचार करणार्‍या व्‍यक्‍ती किंवा संस्‍था अजूनही अस्‍तित्‍वात आहेत. संस्‍कृत भाषेशी संबंधित ग्रंथसंपदाही उपलब्‍ध आहे. काही राज्‍यांमध्‍ये संस्‍कृतमधून नियतकालिके प्रकाशित केली जातात. अर्थात् पडद्याआड जाणार्‍या संस्‍कृतला पुन्‍हा सर्वांसमोर आणण्‍यासाठी इतकेसे प्रयत्न नक्‍कीच पुरेसे नाहीत. संस्‍कृत भाषा शिकणे, तिचा दैनंदिन जीवनात अधिक वापर करणे, भाषेच्‍या उत्‍कर्षासाठी प्रबोधन करणे, हे केल्‍यासच सौजन्‍यशील समाज घडेल. अशा समाजामुळेच जगात ‘संस्‍कृत’ ही भारताची राष्‍ट्रीय भाषा म्‍हणून ओळखली जाईल.