तुळशीविवाह

आज ‘तुळशीविवाह प्रारंभ’ आणि ‘चातुर्मास समाप्त’ आहे. त्या निमित्ताने…

कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीविवाह साजरा केला जातो.

ध्यायेच्च तुलसीं देवीं श्यामां कमललोचनाम् । 
प्रसन्नां पद्मकल्हार वराभय चतुर्भुजाम् ।।

किरीटहारकेयूरकुण्डलादिविभूषिताम् । 
धवलांशुकसभ्युक्तां पद्मासननिषेदुषीम् ।। 

अर्थ : श्यामवर्णी, कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, प्रसन्न, हातात कमलपुष्प धारण करणार्‍या, वर आणि अभय मुद्रेत असलेल्या, चतुर्भुज, किरीट-हार-केयूर-कुंडले अशा अलंकारांनी शोभणार्‍या, शुभ्र वस्त्र परिधान करून पद्मासनावर बसलेल्या अशा तुलसीदेवीचे ध्यान करावे.

पूजनीय आणि वंदनीय अशी तुळस पवित्र, गुणकारी आणि औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. भगवान श्रीविष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे; म्हणून तुळशीला ‘हरिप्रिया’ म्हणतात. श्रीविष्णु आषाढ शुक्ल एकादशीला शयन करतात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात. याच दिवशी ‘चातुर्मास समाप्त’ होत असतो.

श्रीविष्णूच्या जागृतीचा उत्सव म्हणजेच प्रबोधोत्सव. तुळशीविवाह आणि प्रबोधोत्सव हे दोन्ही उत्सव एकत्र साजरे करण्याची प्रथा आहे. यामागील एक कथा अशी आहे की, जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता. त्याने अनेकांना जिंकून वैभव प्राप्त केले होते. त्याची पत्नी वृंदा ही महान पतिव्रता स्त्री होती. तिच्या पातिव्रत्याच्या जोरावरच तो अजिंक्य झाला होता. त्याचा त्याला गर्व झाला होता. जालंधरचे गर्वहरण करावे, या उद्देशाने श्रीविष्णूने जालंधराचे रूप धारण केले आणि त्याच रूपात तो वृंदेजवळ राहू लागला. वृंदेचे पातिव्रत्य भंग पावले आणि जालंधर युद्धात मारला गेला. हे सर्व वृंदेच्या लक्षात येताच तिने श्रीविष्णूला शाप दिला आणि स्वतः अग्निकाष्ठे भक्षण करून सती गेली. तिच्या मृत्यूस्थानी एक वनस्पती उगवली. ती वनस्पती म्हणजेच ‘तुळस’ होय. त्यामुळेच श्रीविष्णूला तुळस अत्यंत प्रिय झाली. तुळस ही पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे. या निमित्ताने आपण पतिव्रता धर्माचे स्मरण करावे आणि पावित्र्याचीच पूजा करावी.

– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली

(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक)