Pakistan Defence Minister Khawaja Asif : पाकिस्तानची लाज निघाली : ब्रिटनमध्ये संरक्षणमंत्र्यांना जाहीर धक्काबुक्की !

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

लंडन (ब्रिटन) – पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्याशी येथील हिथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या मेट्रो स्थानकावर एका व्यक्तीने गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीने लंडन ग्राऊंड स्थानकावर आसिफ यांना केवळ धक्काबुक्कीच केली नाही, तर त्यांना ‘चाकूद्वारे आक्रमण करू’ अशी धमकीही दिली. त्यांना शिवीगाळही करण्यात आली. पाकिस्तानच्या ‘जिओ न्यूज’नुसार आसिफ यांच्या निकटवर्तियांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेचा व्हिडिओही सर्वत्र प्रसारित होत आहे.

व्हिडिओत ख्वाजा आसिफ स्वतःचा चेहरा लपवतांना दिसत आहेत. या घटनेवरून पाकिस्तान सरकारने ब्रिटनमधील पाकिस्तानी उच्चायुक्तांना ब्रिटीश वाहतूक पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. ‘ही गंभीर घटना असून त्याची चौकशी झाली पाहिजे’, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

आसिफ वैयक्तिक भेटीवर लंडनमध्ये आहेत, जिथे त्यांनी पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाझ यांचीही भेट घेतली.

संपादकीय भूमिका

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला कसे लेखले जाते, ते समजण्यासाठी ही घटना पुरेशी आहे. भारतद्वेष हा पाया असलेल्या जिहादी पाकिस्तानचे याहून वेगळे काय होणार ?
  • लंडनमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! एका देशाच्या संरक्षणमंत्र्याची ही स्थिती असेल, तर लंडनमधील सर्वसामान्य जनतेची काय स्थिती असेल ?