मुंबई विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना आनंद मिळण्यासाठी ९ कुत्र्यांसह ‘पॉफेक्ट’ उपक्रम चालू केला आहे. यामध्ये आगमनाच्या वेळी प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या मनोरंजनासाठी ९ प्रशिक्षित कुत्रे असतील. प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी कुत्रे आणून नक्की कोणता हेतू साध्य होणार आहे ? यातून प्रवाशांना ते काय संदेश देणार आहेत ? रामायण, महाभारत, वैदिक धर्म आदींमुळे जगाच्या इतिहासामध्ये भारतीय संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. आपली एवढी महान आणि गौरवशाली भारतीय संस्कृती आहे. त्यातील काहीही तुम्ही पर्यटकांना दाखवू शकता, ज्यामधून त्यांना प्रेरणा मिळेल, शिकायला मिळेल, उत्साह येईल आणि आपल्या संस्कृतीचे महत्त्वही समजेल; मात्र आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या महान गौरवशाली इतिहासाविषयी अभिमान नसल्यामुळेच पर्यटकांना असले हास्यास्पद मनोरंजन केले जात आहे. हीच मानसिकता हिंदूंच्या वैभवशाली संस्कृतीच्या पतनाचे कारण आहे.
आज कित्येक पाश्चात्त्य आपल्या महान भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. अध्यात्मशास्त्र, धर्मशिक्षण यांकडे आकर्षित होऊन हिंदु धर्म स्वीकारत आहेत. अमेरिकेसारख्या पाश्चात्त्य देशांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात आल्याने ते आपल्या संस्कृतीचा गौरव करत आहेत. थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉक विमानतळावर अमृतमंथनच्या प्रसंगाची विशाल प्रतिकृती आहे. थायलंड हा आता बौद्ध देश आहे; पण त्यापूर्वी तेथे हिंदु धर्म होता. आजही येथे सर्व प्रथा हिंदु परंपरेनुसार केल्या जातात. येथे संस्कृत भाषा बोलली जाते. रामायणाला येथे राष्ट्रीय साहित्य मानले जाते. थायलंडचे माजी राजा भूमीबोल यांनी या विमानतळाचे नाव ‘स्वर्णभूमी’ असे ठेवले आणि भगवान विष्णूला ते समर्पित केले आहे. विमानतळाच्या प्रत्येक भागात भगवान विष्णूच्या तत्त्वाची झलक पहायला मिळते. तेथे गरुडाची प्रतिकृतीही आहे. विमानतळावर भारतीय आणि बुद्ध संस्कृतीची झलकही पहायला मिळते. याचप्रमाणे इंडोनेशियाची राजधानी बालीच्या विमानतळावरून बाहेर पडताच समोर एका इमारतीवर गरुडावर स्वार भगवान विष्णूंची एक मोठी मूर्ती दिसून येते. एकेकाळी मलेशिया, इंडोनेशिया, मालदीव, कंबोडिया आणि थायलंड येथे हिंदु धर्म अन् संस्कृती होती; आता ते बौद्ध किंवा इस्लामी असूनही पर्यटकांना हिंदु संस्कृतीने आकर्षित करतात आणि जिथे हिंदु संस्कृतीचा मूळ स्रोत आहे, तिथे (भारतात) मात्र पर्यटकांच्या मनोरंजनासाठी कुत्रे आणत आहेत ! कुठे रामायणातील किंवा समुद्रमंथनाचे देखावे उभारणारी विदेशातील स्थानके आणि कुठे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी कुत्रे आणणारे भारतातील विमानतळ !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे