सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’, या उद्देशाने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना झाली आहे. ‘हा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोचावा’, यासाठी गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्रात ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना’ या २ दिवसांच्या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ८ आणि ९.१०.२०२३ या २ दिवशी हे शिबिर झालेे. या शिबिरामध्ये सहभागी झालेले गोवा येथील बासरीवादक
श्री. रोहित वनकर, बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा पात्रीकर, डोंबिवली (ठाणे) येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी, ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६० वर्षे) आणि पं. संजय मराठे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६७ वर्षे) या कलाकारांनी शिबिराच्या सत्रात आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे दिले आहे.
१. श्री. रोहित वनकर, एम.ए. संगीत (बासरी), पणजी, गोवा.
१ अ. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्रात बासरीवादन करायला मिळणे’, हे भाग्य असणे, येथे सकारात्मक ऊर्जा, म्हणजे देवत्व असणे : ‘मला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्राच्या वास्तूमध्ये बासरीवादन करायला मिळाले’, हे मी माझे भाग्य समजतो. या आध्यात्मिक संशोधनकेंद्राच्या वास्तूत पाय ठेवताच नकारात्मक विचार निघून जाऊन येथील वातावरणात हरवून जायला होते. येथून बाहेर पडल्यावरच सगळे जग आठवते. येथे सकारात्मक ऊर्जा, म्हणजेच देवत्व आहे.
१ आ. श्रोत्यांच्या हृदयापर्यंत संगीत पोेचवण्याची शक्ती साधनेने येणे : मनुष्य साधना करत नाही किंवा तो नास्तिक असतो, तेव्हा त्याचे संगीत शून्य असते; कारण श्रोत्यांच्या हृदयापर्यंत संगीत पोेचवण्याची शक्ती केवळ साधनेमुळेेच येते. आतला स्वर कळण्यासाठी संगीताला अध्यात्माची जोड देणे आवश्यक आहे. मी येथील शिबिरार्थींना सांगू इच्छितो, ‘तुम्हीही येथील चैतन्यमय वातावरणाची अनुभूती घ्या.’
२. सौ. मनीषा पात्रीकर (कथ्थक अलंकार), नृत्यगुरु, मुंबई.
२ अ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्रात आल्यावर ‘संगीतातून साधना म्हणजेकाय ?’, हे खर्या अर्थाने कळणे : ‘नृत्य किंवा संगीत ही साधना कशी आहे ?’, हे मला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्रात आल्यावर खर्या अर्थाने कळले. मागच्या वेळी मी नृत्याच्या प्रस्तुतीसाठी येथे आले होते. तेव्हा मी कृष्णाची अष्टपदी प्रस्तुत केली होती. त्या वेळी मला माझ्या डाव्या बाजूला मोरपंखी रंग दिसून ‘मी त्या कृष्णतत्त्वाशी एकरूप होत आहे’, असे जाणवले होते. ‘हे अनुभवणे’, ही खरी साधना आहे. त्यामुळे आपल्याला अद़्भुत आनंद होतो; कारण ही ईश्वराने दिलेली अनुभूती असते.
२ आ. संशोधन केंद्रात नृत्य करतांना कित्येक पटींनी दैवी आनंद मिळणे : बाहेर कुठेही नृत्याचे प्रस्तुतीकरण करतांना होणार्या आनंदापेक्षा मला या संशोधन केंद्रात नृत्य करतांना कित्येक पटींनी दैवी आनंद मिळतो. मला त्या तत्त्वाची खरी ओळख इथे झाली.
२ इ. शिबिराच्या आदल्या दिवशी नृत्याची प्रस्तुती करतांना आलेल्या अनुभूती
२ इ १. ‘नामजप करून विष्णुवंदना सादर केल्यावर स्वतःमधील जडत्व निघून गेले’, असे जाणवून प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध येणे : आमच्याकडून (मी आणि माझ्या समवेत आलेल्या विद्यार्थीनी यांच्याकडून) ‘नामजप न करता विष्णुवंदना करणे आणि नामजप करून विष्णुवंदना सादर करणे’, असा संशोधनात्मक प्रयोग करून घेण्यात आला. प्रथम नामजप न करता विष्णुवंदना प्रस्तुत केल्यावर आम्हाला श्रीकृष्णाचा नामजप १ घंटा करायला सांगितला. हा नामजप केल्यावर मला ‘माझ्यातील जडपणा निघून गेला’, असे जाणवून प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध आला.
२ इ २. श्रीकृष्ण अर्जुनाला गीताज्ञान देतांनाचा प्रसंग नृत्याद्वारे साकारतांना ‘नृत्य भूमीवर करत नसून उंचावर करत आहे’, अशी अनुभूती येणे : कुरुक्षेत्रात स्वतःच्या नातेवाइकांना शत्रूपक्षात बघून अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला. तेव्हा ‘श्रीकृष्ण अर्जुनाला गीताज्ञान सांगतो’, हे दृश्य मला नृत्याद्वारे दाखवायचे होते. त्या प्रसंगात मी कृष्ण झाले होते अन् माझी शिष्या अर्जुन झाली होती. हे दृश्य सादर करतांना मला माझी शिष्या दिसली नाही. मला समोर युद्धाचे मैदान दिसून तिथे श्रीकृष्ण आणि सगळी कौरवसेना दिसली. हे नृत्य करतांना मला ‘माझे पाय भूमीवर नसून मी पुष्कळ उंचावर नृत्य करत आहे’, अशी विलक्षण अनुभूती आली.
२ इ ३. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दर्शनाच्या वेळी ‘ते पू. मेहेरबाबाच आहेत’, असे वाटून भावजागृती होणे आणि ‘गुरुतत्त्व एकच असते’, याची प्रचीती येणे :
पू. मेहेरबाबा हे माझे गुरु आहेत. मला त्यांना प्रत्यक्ष पहाण्याची पुष्कळ इच्छा होती; पण मी साधनेत येण्याआधीच त्यांनी देह ठेवल्याने माझी त्यांच्याशी भेट झाली नाही. मागच्या वेळी मी येथे आले असतांना मला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्यांचे तेजस्वी रूप पहातांना मला ‘मी माझे गुरु पू. मेहेरबाबांनाच स्थुलातून पहात आहे’, असे जाणवून माझी भावजागृती झाली. तेव्हा ‘गुरुतत्त्व एकच असते’, याची मला प्रचीती आली.’
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/738093.html |