विशाळगड (जिल्हा कोल्हापूर) – सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ज्या पद्धतीने ‘मशाल महोत्सव’ साजरा होतो, त्याच धर्तीवर या वर्षीपासून कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी विशाळगड येथेही ‘मशाल महोत्सव’ चालू करण्यात आला. विशाळगडावर श्री खोकलाईदेवीचे मंदिर ते नरसोबा मंदिर ते वाघजाई मंदिरापर्यंत मशाल यात्रा काढण्यात आली. या प्रसंगी नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचे ११ वे वंशज श्री. संदेश देशपांडे, हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री. नितीन शिंदे, गजापूरचे ज्येष्ठ शिवभक्त श्री. नारायणराव वेल्हाळ यांसह विविध मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी संपूर्ण विशाळगडावर मशाली लावण्यात आल्या, तसेच परिसर ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणांनी दणाणून गेला.
या वेळी श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘प्रतापगडाप्रमाणे विशाळगडावर झालेले अतिक्रमण पूर्णपणे त्या ठिकाणाहून काढून टाकायला लावून विशाळगडाला गतवैभव प्राप्त करून देणार, असा निर्धार आज सर्व शिवभक्तांनी करावा. विशाळगडावर जाण्यासाठी नव्याने पायर्या बांधणे, नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीस्थळाकडे जाण्यासाठी रस्ता करण्ो, गडावरील पडझड झालेली मंदिरे अन् वास्तू यांचा जिर्णाेद्धार करण्ो यांसाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा.’’
श्री. संदेश देशपांडे म्हणाले, ‘‘यंदाच्या वर्षीपासून आपण हा महोत्सव नव्याने चालू करत आहोत. पुढील वर्षीपासून मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांनी यात सहभागी व्हावे.’’ या प्रसंगी गजापूरचे सरपंच श्री. चंद्रकांत पाटील, हिंदु एकताचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव, सर्वश्री अमित सूर्यवंशी, अनिरुद्ध कुंभार, श्रीनिवास नाझरे, चेतन भोसले, ओंकार पवार, पंकज कुबडे, ‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.