पुणे येथील खडकवासला जलाशयात आढळला खासगी आस्थापनाचा जैववैद्यकीय कचरा !

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणाच्या जलाशयात जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन करणार्‍या खासगी आस्थापनाच्या बाटल्या आणि खोकी आढळून आली. हा प्रकार धरणाची सुरक्षा करणार्‍या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने स्थानिक पोलीस, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले. या प्रकरणी एकाला कह्यात घेण्यात आले आहे.

जलसंपदाच्या कर्मचार्‍यांनी पाण्यातून खोकी, बाटल्या बाहेर काढल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पाण्याची पडताळणी केली, तर पोलिसांकडून पाण्यात खोकी, बाटल्या कुणी टाकल्या, याविषयी अन्वेषण चालू करण्यात आले. खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्‍हाडे यांनी सांगितले की, या प्रकारानंतर धरण परिसरात १३ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. जलाशयात टाकलेली खोकी आणि बाटल्या रिकाम्या होत्या.