कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची द्वितीयेला श्री महागौरीच्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती. महागौरी ही गौरवर्णाची आहे. अष्टवर्षा भवेद गौरी म्हणजे ती ८ वर्षांची आहे. वस्त्रालंकार श्वेतवर्णाचे असून देवी चतुर्भुज आहे. तिचे वाहन वृषभ आहे. तिच्या डाव्या बाजूला वरच्या हातात अभय मुद्रा, खालच्या हातात त्रिशूळ आहे, तर उजवीकडे वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. तिची भावमुद्रा प्रसन्न आणि शांत आहे. पार्वतीच्या रूपात तिने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप:श्चर्या केली होती. कठोर तप:श्चर्येमुळे तिचे शरीर काळे पडले. तिच्या तप:श्चर्येमुळे प्रसन्न होऊन शिवाने गंगेचे पवित्र स्नान घडवले. त्यामुळे तिचे शरीर गौरवर्णाचे झाले.
ही पूजा श्रीपूजक आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, चैतन्य मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली हाेती.