मुंबई, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – कोरोनामुळे महाराष्ट्रातील ८६९ बालके अनाथ झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. यामध्ये आई आणि वडील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला किंवा एका पाल्याचा मृत्यू कोरोनामुळे आणि अन्य पालकांचा मृत्यू अन्य कारणामुळे झाला अशा मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून या सर्व मुलांना प्रत्येकी ५ लाख रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात २२ एप्रिल २०२१ पासून संपूर्ण दळणवळण बंदी लागू करण्यात आली; मात्र त्यापूर्वीही कोरोनामुळे महाराष्ट्रातील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे १ मार्च २०२० पासून पुढे ० ते १८ वर्षे वयोगटातील ज्या मुलांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्या मुलांच्या संगोपनासाठी राज्यशासनाकडून हे विशेष अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. ही रक्कम अनाथ बालक आणि जिल्हा महिला अन् बाल विकास अधिकारी यांच्या सामायिक खात्यात ‘मुदत ठेव’ म्हणून जमा करण्यात आली आहे. बालकांच्या वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना हे पैसे प्राप्त होणार आहेत; मात्र त्यासाठी संबंधित मुलगा अथवा मुलगी यांचा बालविवाह झालेला नसावा, ही अट आहे. या मुलांच्या शैक्षणिक साहाय्यासाठीही महाराष्ट्र शासनाकडून २५ कोटी ५३ लाख रुपये इतके प्रावधान करण्यात आले असून ही रक्कम सर्वाेच्च न्यायालयाकडे बाल न्याय निधी म्हणून जमा करण्यात आली आहे.
केंद्रशासनाकडून १० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य !
कोरोनामुळे पालक गमावलेल्या १८ वर्षे वयोगटातील बालकांना केंद्रशासनाकडूनही १० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले आहे. यामध्ये १ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत पालकांचा मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील ८५२ मुलांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.
बालसंगोपनासाठी प्रतिमास अर्थसाहाय्य !
५ लाख रुपयांच्या एकरकमी अर्थसाहाय्यासह या बालकांच्या संगोपनासाठी प्रतिमास महिला आणि बाल कल्याण विभागाकडून अडीच सहस्र रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. वयाच्या १८ वर्षांपर्यंत हे अर्थसाहाय्य शासनाकडून देण्यात येणार आहे.