सनातन धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र हा धर्मयुद्धाचा प्रारंभ ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

तरणा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ पार पडली !

डावीकडून सौ. प्राची जुवेकर आणि मार्गदर्शन करतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ

वाराणसी (उत्तरप्रदेश) – सनातन धर्माला नष्ट करण्याचे षड्यंत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा देऊन भारतात इस्लामिक राष्ट्र स्थापन करण्याच्या हालचाली तीव्र होत आहेत. हा धर्मयुद्धाचा प्रारंभ आहे. प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यानेच या धर्मयुद्धात विजय मिळणार आहे. त्यामुळे हिंदूंनी जागृत होऊन संघटित रहाण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. उत्तरप्रदेशातील तरणा येथील शारदा मंगलम् वाटिकेमध्ये समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त ते मार्गदर्शन करत होते. या सभेचे आयोजन वाराणसीमधील चमाव गावचे माजी प्रमुख श्री. जयप्रकाश सिंह यांनी केले होते. या सभेला गावातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सद्गुरु सिंगबाळ पुढे म्हणाले, ‘‘सनातन धर्माला नष्ट करणार्‍यांवर कारवाई होत नाही. उलट त्यांच्याकडूनच हिंदु मंदिरे चालवण्यात येत आहेत. मंदिरांची लक्षावधी भूमी सरकारकडून अधिग्रहित करण्यात येत आहे. आता हिंदु समाजाने गावागावांमधील लहान लहान मतभेद विसरून संघटित होऊन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा पुनर्जीवित कराव्या लागतील. हिंदु संघटनांमध्ये दबलेल्या हिंदु राष्ट्राच्या सुप्त इच्छेला जागृत करावे लागेल. तसेच युवा शक्तीला राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी पुढे यावे लागेल.’’

या वेळी सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी स्वतःतील आध्यात्मिक बळ कसे वाढवावे ?’, याविषयी मार्गदर्शन केले.

क्षणचित्र

सभेनंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी घेतलेल्या बैठकीत सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी अधिवक्त्यांकडून स्वाक्षरी अभियान राबवणे आणि प्रत्येक गावात अशा प्रकारच्या सभेचे आयोजन करून हिंदूंमध्ये जागृती करण्याचा निर्धार करण्यात आला.