नागपूर – नवरात्रोत्सवातील ‘गरब्या’मध्ये फक्त हिंदूंना प्रवेश द्या, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. गैरहिंदूंची आदिशक्तीवर एवढीच श्रद्धा असेल आणि गरब्यात सहभागी व्हायचेच असेल, तर तत्पूर्वी त्यांनी रितसर घरवापसी करून घ्यावी, अशी रोखठोक भूमिका विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी ११ ऑक्टोबर या दिवशी घेतली आहे.
गोविंद शेंडे म्हणाले की, गरब्यात प्रवेश देण्यापूर्वी आयोजकांनी संबंधितांची आधारकार्ड पडताळणी करणे, गोमूत्र देणे, टिळा लावणे असे अनेक पर्याय विहिंपने दिले आहेत. यासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्यास विहिंपचे कार्यकर्ते अथवा कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. केवळ महिलांचे गरबे असतात, तिथे महिला कार्यकर्त्या साहाय्य करतील; पण काहीही झाल्यास सदोष मानसिकतेच्या लोकांना प्रवेश मिळता कामा नये.