सनातन धर्माला रोगांची उपमा देणारे स्‍वतःच मानसिक रोगी ! – खासदार साध्‍वी प्रज्ञा सिंह

व्‍यासपिठावर उपस्‍थित साध्‍वी प्रज्ञा सिंह (मध्‍यभागी) आणि अन्‍य मान्‍यवर

वसई (पालघर) – सनातन धर्म विश्‍वातील एकमेव धर्म असून अन्‍य धर्म, पंथ हे नंतर निर्माण झालेले आहेत. ‘वसुधैव कुटुम्‍बकम्’ अशी उदात्त भावना असलेला आणि सनातनी जिथे रहातो, त्‍या भूमीला मातेचा दर्जा देणारा हा एकमेव धर्म आहे. अशा सनातन धर्माला रोगांची उपमा देणारे हे स्‍वतःच मानसिक रोगी आहेत, असा घणाघात भाजपच्‍या भोपाळ, मध्‍यप्रदेश येथील खासदार साध्‍वी प्रज्ञा सिंह यांनी सनातन विरोधकांवर येथे केला. येथील साईनगर मैदानात धर्मसभेच्‍या वतीने आयोजित ‘प्रखर राष्‍ट्रचेतना सभे’त त्‍या बोलत होत्‍या.

त्‍या पुढे म्‍हणाल्‍या की, सनातनी कुणाला छेडत नाहीत आणि छेडणार्‍याला सोडत नाहीत. विरोधकांनी प्रभु श्रीराम, श्रीकृष्‍ण आणि महाराणा प्रताप यांचा इतिहास अभ्‍यासावा. छळवादी, भ्रष्‍टाचारी आणि घोटाळेबाज यांच्‍या आघाडीचे नामकरण ‘इंडिया’ झाले आहे. भारताविरुद्ध लव्‍ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर आणि विविध जिहाद केले जात आहेत; मात्र आता सनातनी जागृत होत आहेत आणि ते या जिहादांना प्रत्‍युत्तर देऊ लागले आहेत. धर्म आणि राष्‍ट्र रक्षण हे आपले दायित्‍व आहे, ते आपण प्रत्‍येक सनातनी व्‍यक्‍तीने पार पाडले पाहिजेे.

या सभेला उपस्‍थित नागरिकांनी ‘सनातन धर्म की जय’, ‘भारतमाता की जय’, ‘वन्‍दे मातरम्’ या घोषणांनी मैदान दणाणून सोडले. श्री. हरेश्‍वर नाईक यांनी सूत्रसंचालन केले. राष्‍ट्रगीताने सभेची सांगता झाली.