सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या मानाच्या सासनकाठीला केंद्रशासनाचे ‘कॉपीराईट’ नामांकन !

जोतिबा (जिल्हा कोल्हापूर) – श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेत प्रथम क्रमांकाचा मान असणार्‍या सातारा जिल्ह्यातील मानाच्या सासनकाठीला केंद्रशासनाचे ‘कॉपीराईट’ नामांकन प्राप्त झाले. याचा प्रकाशन सोहळा जोतिबा देवाच्या मुख्य मंदिरात २ ऑक्टोबरला पार पडला. या प्रसंगी कोडोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे जोतिबा येथील अधीक्षक धैर्यशील तिवले, पाडळीचे सरपंच अमरसिंह ढाणे, ‘ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्ट’ पाडळीचे सर्व विश्वस्त, अध्यक्ष रवींद्र ढाणे, डॉ. हनुमंत ढाणे, कुलदीप ढाणे यांसह जोतिबा देवस्थानचे पुजारी, पाडळी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

पाडळी गावच्या या मानाच्या सासनकाठीला चैत्र यात्रेत मोठा मान आहे. पाडळी ते जोतिबा डोंगरावर ही सासनकाठी ग्रामस्थ पायी चालत घेऊन येतात. ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात या सासनकाठीचे स्वागत होत. चैत्र यात्रा काळात पूर्ण गाव एक मास शाकाहारी असते. ‘आमच्या सासनकाठीची कोणी ‘कॉपी’ (तशाच प्रकारची दुसरी सासनकाठी) करू नये; म्हणून आम्ही नामांकन मिळविले आहे’, असे विश्वस्तांनी सांगितले.