हिंदु धर्मात समुद्रगमनाचा समृद्ध इतिहास असतांना तो नाकारून ‘हिंदु धर्मात समुद्र ओलांडायला बंदी आहे’, असे पुरो(अधो)गाम्‍यांनी म्‍हणणे हा खोडसाळपणा !

दैनिक ‘लोकसत्ता’च्‍या १७ सप्‍टेंबरच्‍या अंकात ‘सनातनी (धर्म) संकट !’ या मथळ्‍याखाली अग्रलेख प्रसिद्ध झाला असून त्‍यात सनातन धर्मावर टीका करून त्‍यात सनातन धर्म हा ‘स्‍त्रीविरोधी’, ‘विज्ञानविरोधी’, ‘जातीव्‍यवस्‍था मानणारा’ असे चित्र रंगवण्‍यात आले आहे. या अग्रलेखात सनातन धर्माविषयी केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्‍याचे खंडण येथे देत आहे. (टीप : ‘लोकसत्ता’च्‍या अग्रलेखातील भाषा आणि व्‍याकरण यात पालट न करता तसेच ठेवण्‍यात आले आहे.)

आक्षेप 

विद्यासाधनेसाठी परदेश-गमन केले म्‍हणून आनंदीबाई जोशी आणि पती गोपाळराव यांना प्रायश्‍चित्त घ्‍यावे लागले ते याच सनातनी विचारांच्‍या टोकाग्रहातून. एकेकाळच्‍या हिंदू धर्मात सप्‍तसिंधुबंदी सांगितलेली होती. म्‍हणजे समुद्र ओलांडायला बंदी. आजच्‍या सनातन हिंदू धर्मीयानेदेखील तेच करणे अपेक्षित आहे का? तसे असेल तर वेगवेगळ्‍या देशांमध्‍ये जाऊन काम करणार्‍या हिंदूधर्माभिमान्‍यांनी परत भारतात यावे काय ? मग त्‍यांच्‍याकडून भिक्षेत पडणारे ‘डॉलर्स’ आता त्‍यागावेत काय?

खंडण

१. हिंदूंचे अवतार आणि ऋषिमुनी यांनी समुद्रगमन केले असतांना हिंदूंसाठी समुद्रगमन निषिद्ध कसे ?

१. ऋग्‍वेदामध्‍ये नौकेने समुद्र पार केल्‍याचे कित्‍येक उल्लेख मिळतात. ऋग्‍वेदात ‘१.११.६. ३’ क्रमांकाच्‍या श्‍लोकात तुग्र या वैदिक काळातील ऋषि राजाने मुलगा भुज्‍यु यास इतर बेटांवरील शत्रूंचा निप्‍पात करण्‍यासाठी जहाजातून पाठवल्‍याचा, तसेच सागरी मार्गाने व्‍यापार केल्‍याचा उल्लेख आढळतो.

२. अथर्ववेदामध्‍ये सुरक्षित, विस्‍तारित आणि आरामदायक नौकांचा उल्लेख आहे. वैदिक काळातही भारतीय लोक बळकट नौका बनवून समुद्र पार करत दूरच्‍या देशांमध्‍ये व्‍यापार आणि दिग्‍विजयासाठी जात, असा उल्लेख आहे.

३. प्रभु श्रीरामाने सीतामातेला परत आणण्‍यासाठी समुद्र पार करून श्रीलंका सर केली होती. महर्षि अगस्‍त्‍य हे समुद्रमार्गे द्वीपांची यात्रा करणारे महापुरुष होते. ते कौण्‍डिण्‍य समुद्र पार करून सध्‍याचा दक्षिण पूर्व आशिया येथे गेले होते. त्‍यामुळे ‘हिंदु धर्मात समुद्रगमन निषिद्ध आहे’, असे म्‍हणणे चुकीचे आहे.

४. नौकावहनाची कला आणि नौवहनाचा जन्‍म ६ सहस्र वर्षांपूर्वी प्रथम सिंधु नदीच्‍या परिसरात झाला. मौर्य (इ.स. पूर्व ४ ते २ रे शतक), पल्लव ( ३ रे ते ९ वे शतक), चोल (४ थे ते १३ वे शतक), चेरा (पूर्व) (३ रे ते ९ वे शतक), चेरा (कुलशेखर) (९ ते १२ वे शतक), चालुक्‍य (६ ते ८ वे शतक), पाल (८ ते १२ वे शतक) आणि मराठा (वर्ष १६५० ते १८१८) या सर्व सत्तांकडे नाविक बळ होते. हे पहाता समुद्रबंदीचा शास्‍त्रातील उल्लेख किती मर्यादित अर्थाने आहे, हे लक्षात येते.

५. ख्रिस्‍तपूर्व तिसर्‍या शतकात चंद्रगुप्‍त मौर्यच्‍या कालखंडात जगभर व्‍यापार करणारी जहाजे प्रसिद्ध होती. तसे ताम्रपत्र आणि शिलालेख उपलब्‍ध आहेत. चोल राजवंशाच्‍या काळात भारतीय जलव्‍यापार अत्‍यंत भरभराटीच्‍या स्‍थितीत होता. जहाज बांधणी हा चोल राजवंशाच्‍या सागरी यशाचा एक महत्त्वाचा पैलू होता. या प्रगतीमुळे त्‍यांना हिंद महासागर ओलांडून लांबच्‍या प्रवासाला तोंड देण्‍यास सक्षम जहाजे बनवता आली.

२. समुद्रगमन निषिद्ध असल्‍याचे सांगणारे काही ग्रंथांतील संदर्भ आणि त्‍यामागील कारण !

१. मनुस्‍मृतीतील ३ र्‍या अध्‍यायात १५८  व्‍या श्‍लोकात ‘श्राद्धास कुणास बोलावू नये’, हे सांगतांना ‘समुद्रउल्लंघन केलेल्‍यास बोलावू नये’, असा संदर्भ येतो, तसेच बौधायन सूत्रात त्‍याचा उल्लेख आढळतो.

२. पूर्वी हिंदूंचे राजे संपूर्ण पृथ्‍वीवर राज्‍य करत असत. भारत हे हिंदूंचे केंद्रस्‍थान होते. त्‍यामुळे भारतातील हिंदू जगात कुठेही प्रवासाला गेला, तर त्‍यांना धर्माचरण करण्‍यास किंवा प्रथा-परंपरा यांचे पालन करण्‍यास अडचण येत नसे. नंतर धर्माला ग्‍लानी येऊन जगात केवळ भारत हा हिंदु धर्माचा केंद्रबिंदू राहिला. त्‍यामुळे ‘परकियांशी (म्‍लेंछांशी) संपर्क आल्‍यामुळे धर्मपालन करणे, तसेच शास्‍त्र किंवा धर्मनियम पाळणे यांस येणार्‍या अडचणींमुळे समुद्र उल्लंघन करणे निषिद्ध असल्‍याचे सांगण्‍यात आले. त्‍यामुळे मधल्‍या काही काळात आनंदीबाई जोशी किंवा अन्‍यांना समुद्रप्रवासासाठी विरोध झालेला असू शकतो.

हिंदु धर्मातील प्रत्‍येक धर्मग्रंथ हा जिवाच्‍या व्‍यष्‍टी आणि समष्‍टी उत्‍कर्षाला केंद्रबिंदू धरून लिहिले आहेत. त्‍यामुळे आध्‍यात्मिक उन्‍नतीला बाधा येणार्‍या कर्मांपासून जिवाने लांब राहिले, तर त्‍याची आध्‍यात्मिक उन्‍नती होईल, हा धर्मग्रंथांतील शिकवणीचा मूळ गाभा आहे. त्‍याचा अभ्‍यास न करता स्‍वार्थासाठी समुद्रगमनाविषयी नाहक टीका करणे, हे हास्‍यास्‍पद होय !

(क्रमशः)