गोवा : ‘सनबर्न’ आणि ‘रायडर मॅनिया’ यांच्या आयोजकांना उच्च न्यायालयाचा दणका !

थकबाकी भरा, अन्यथा भविष्यात अनुज्ञप्ती नाही !

‘रायडर मॅनिया’ आणि ‘सनबर्न’

पणजी, २८ सप्टेंबर (वार्ता.) : उत्तर गोव्यातील हणजूण येथील कोमुनिदादच्या भूमीत झालेला ‘सनबर्न’ महोत्सव, तसेच ‘रायडर मॅनिया’कार्यक्रम यांच्या आयोजकांनी अनुक्रमे ३६ लाख ९५ सहस्र ७३६ रुपये आणि १२ लाख ६७ सहस्र १२० रुपये थकबाकी अद्याप हणजूण कोमुनिदादला दिलेली नाही. या दोन्ही कार्यक्रमांच्या आयोजकांनी प्रथम थकबाकी भरावी, अन्यथा त्यांना भविष्यात अनुज्ञप्ती दिली जाणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिला आहे.

हणजूण कोमुनिदादचे प्रशासक आणि गोवा सरकार यांनी ‘सनबर्न’ अन् ‘रायडर मॅनिया’ यांच्या आयोजकांना हणजूण येथील कोमुनिदादच्या भूमीत महोत्सवाचे आयोजन करण्यासाठीचे शुल्क न्यून करण्याचा निर्णय घेतला आहे. (संबंधितांना वैयक्तिक आर्थिक लाभ झाल्यामुळे हा निर्णय घेतला गेला असणार, असे जनतेला वाटल्यास ते चुकीचे ठरू नये ! – संपादक) गोवा खंडपिठाने हणजूण कोमुनिदादचे प्रशासक आणि गोवा सरकार यांचा हा निर्णय रहित केला आहे.