पुणे येथे ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या गर्दीत नृत्य करण्यासाठी मुले-मुली पाहिजेत’, अशा आशयाचे विज्ञापन प्रसिद्ध !


भोसरी (जिल्हा पुणे) – येथील वर्तमानपत्रांत जिथे नोकरी संदर्भातील विज्ञापने असतात, त्याच रकान्यात ‘भोसरी परिसरात श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या गर्दीत नृत्य करण्यासाठी मुले-मुली पाहिजेत’, अशा आशयाचे विज्ञापन प्रसारित झाले आहे.

या विज्ञापनाच्या माध्यमातून श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या गर्दीत नृत्य करणार्‍यांना संधी दिली जाणार आहे. हे विज्ञापन प्रसिद्ध करणार्‍याचे नाव लिहण्यात आलेले नाही; मात्र ठिकाण भोसरी असे लिहले आहे. या विज्ञापनात संपर्क साधण्यासाठी भ्रमणभाष क्रमांकही देण्यात आला आहे. विज्ञापनाच्या कात्रणाचे छायाचित्र सामाजिक माध्यमावर प्रसारित होत आहे.

विज्ञापनाच्या कात्रणाचे छायाचित्र

‘श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या गर्दीमध्ये नृत्य करण्यासाठी फक्त १ दिवस म्हणजे २७ सप्टेंबर या दिवशी १०० मुले-मुली पाहिजेत. वय १८ ते ३० वर्षे, वेळ संध्या ५ ते रात्री १०, स्थळ – भोसरी, वेतन ३०० रुपये’, असा मजकूर या विज्ञापनात दिला आहे.

संपादकीय भूमिका

विसर्जन मिरवणुकीत पैसे घेऊन चित्रपट गीतांवर हिडीस नृत्य करणारे नव्हे, तर भजन आणि नामजप यांच्या गजरात भक्तीभावाने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणारे भाविक आवश्यक असतात. आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि सवंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारे विज्ञापने देऊन नाचणार्‍यांची गर्दी गोळा केली जाते, हे लज्जास्पद आहे !

सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश अशा प्रकारांमुळे कधीतरी साध्य होईल का ?