श्री गणेशाविषयीच्‍या काही कथा

श्री गणेशाला एकच दात का ?

श्री गणेशाच्‍या एकदंताविषयी अनेक कथा आहेत. त्‍यामध्‍ये ‘शंकरांनी क्रोधाने त्‍याचा एक दात मोडला’ आणि ‘परशुरामाने युद्धात गणेशाचा दात मोडला’, अशा २ कथा आहेत. यासह आणखी २ कथा येथे देत आहोत.

श्री गणेश ज्‍या वेळी गजमुख राक्षसाशी युद्ध करू लागला, त्‍या वेळी त्‍या दैत्‍याने गणेशाचा एक दात मोडला. तो मोडलेला दात हातात घेऊन गणेशाने गजमुख राक्षसावर प्रहार केला. त्‍या वेळी तो राक्षस घाबरला आणि त्‍याने उंदराचे रूप घेतले. गणपतीने लगेच त्‍या उंदराला आपले वाहन केले, अशी एक कथा एकदंत अन् मूषकवाहन यांच्‍याशी संबंधित आहे. ‘गणेश पुराणा’त दिलेली कथा विनायक अवतारातील आहे. देवांतक असुराला मारण्‍यासाठी गणेशाने प्रचंड रूप धारण केले आणि त्‍याने देवांतकाला स्‍वत:च्‍या मांडीवर घेतले. देवांतकाने तेथूनच गणेशाचा एक दात पकडून तो झोके घेऊ लागला. तेव्‍हा तो दात तुटला. गणपतीने तोच दात घेतला आणि त्‍यावर प्रहार केला. त्‍यामुळे त्‍याच्‍या मस्‍तकाचे तुकडे तुकडे झाले. गणेश एकदंत कसाही झालेला असो; पण एकदंत हे त्‍याच्‍या पराक्रमाचे भूषण आहे, हे नक्‍कीच !’

गणपतीची मूर्ती मृत्तिकेचीच का ?

‘द्वापरयुगातील गणेशावतारांविषयी अशी कथा आहे की, पार्वतीने स्नानाच्‍या वेळी उटणे, तेल इत्‍यादी लावले असतांना तिच्‍या अंगाचा मळ पुष्‍कळ निघाला. तो एकत्र करून तिने त्‍याची एक बालकाची मूर्ती सिद्ध केली. त्‍या मूर्तीमध्‍ये प्राण आणून ती एका बालक रूपात सिद्ध झाली. नंतर तो बालक आईच्‍या सांगण्‍यावरून दारात ‘रक्षक’ म्‍हणून उभा होता. त्‍याने भगवान शंकरांनासुद्धा घरात येऊ दिले नाही; म्‍हणून शंकरांनी त्‍याच्‍याशी युद्ध करून त्‍याचे मुख छाटले. ते पाहून पार्वती अतिशय शोक करू लागली. ते सहन न होऊन शंकरांनी त्‍याला हत्तीचे मुख लावले आणि तो जिवंत झाला. पार्वतीला आनंद झाला. असा हा भाद्रपद चतुर्थीचा अवतारी गजानन ! पार्वतीने मृत्तिकेचा गणपति केला; म्‍हणून गणेशोत्‍सवाची मूर्ती मृत्तिकेचीच बसवण्‍याची प्रथा आहे.’

(साभार : मासिक ‘सदाचार आणि संस्‍कृति’, सप्‍टेंबर २०१४)