आद्यशंकराचार्य यांच्‍या महान कार्यावर कलात्‍मक अंगाने प्रकाश टाकायचे भाग्‍य मला लाभले ! – आशुतोष गोवारीकर, दिग्‍दर्शक

आशुतोष गोवारीकर सादर करणार ‘आद्यशंकराचार्य’ यांच्‍या जीवनचरित्रावर आधारित चित्रपट !

पुणे – ‘बॉलिवूड’मधील सर्वोत्तम दिग्‍दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आद्यशंकराचार्य यांच्‍या जीवनचरित्रावर बेतलेल्‍या चित्रपटाची घोषणा केली आहे. आपल्‍या ‘टि्‌वटर अकाऊंट’वरून माहिती देत आशुतोष यांनी आगामी ‘शंकर’ या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. ही पोस्‍ट करतांना आशुतोष लिहितात, ‘आद्यशंकराचार्य यांचे महान कार्य, ज्ञान आणि जीवनावर कलात्‍मक अंगाने प्रकाश टाकायचे भाग्‍य माझ्‍या नशिबी लाभले आहे. हा पुष्‍कळ मोठा मान आहे.’

हा चित्रपट ‘आचार्य शंकर सांस्‍कृतिक एकता न्‍यास’ आणि ‘एकता धाम’ यांच्‍या सहयोगाने लोकांसमोर आणणार असल्‍याचेही आशुतोष यांनी घोषित केले आहे. या ‘पोस्‍ट’सह आशुतोष यांनी चित्रपटाचे ‘पोस्‍टर’ही ‘शेअर’ केले आहे. ‘शंकर-आध्‍यात्‍मिक जनरल’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. भारतातील एका उत्तुंग व्‍यक्‍तिमत्त्वाच्‍या जीवनावर बेतलेल्‍या या चित्रपटाचे दिग्‍दर्शन स्‍वतः आशुतोष गोवारीकर करणार आहेत.