भारताच्‍या शूर सैनिकांच्‍या बलीदानामुळे सैन्‍याची मोठी हानी

‘काश्‍मीरच्‍या अनंतनागमध्‍ये आतंकवाद्यांशी झालेल्‍या चकमकीत भारताचे अतिशय शूर सैनिक हुतात्‍मा झाले. त्‍यांतील कर्नल मनप्रीत सिंह हे १९ राष्‍ट्रीय रायफल्‍सचे कमांडिंग ऑफिसर होते. त्‍यांच्‍या समवेत मेजर आशुतोष आणि पोलीस उपअधीक्षक हुमायू भट हेही हुतात्‍मा झाले आहेत. आतंकवादी एका ठिकाणी लपून बसल्‍याची बातमी मिळाली होती. त्‍यांच्‍या विरोधात मोहीम राबवत असतांना समोरासमोर लढाई झाली. त्‍यात कर्नल मनप्रीत सिंह हुतात्‍मा झाले. कर्नल मनप्रीत सिंह यांची पत्नी हरियाणातील एका महाविद्यालयामध्‍ये प्राध्‍यापिका आहे. त्‍यांना ६ वर्षांची मुलगी आणि २ वर्षांचा मुलगा आहे. ते अनुभवी अधिकारी होते. राष्‍ट्रीय रायफलमधील त्‍यांची सेवा येत्‍या ४ मासांमध्‍ये संपुष्‍टात येणार होती. त्‍यानंतर त्‍यांचे दुसर्‍या शांत ठिकाणी स्‍थानांतर होणार होते, असे म्‍हटले जाते; परंतु नियतीला हे मान्‍य नव्‍हते. भारतीय सैन्‍याधिकार्‍यांचे हे वैशिष्‍ट्य आहे की, ते त्‍यांच्‍या सैनिकांचे नेतृत्‍व आघाडीवर राहून करतात. त्‍यामुळे चकमक यशस्‍वी होते; परंतु बहुतांश वेळा धोकादायक परिस्‍थितीत आधिकार्‍यांनाही प्राण गमवावे लागतात. कर्नल मनप्रीत सिंह यांना यापूर्वीही सेना मेडल गॅलन्‍ट्री हा पुरस्‍कार मिळाला आहे. त्‍यांच्‍यासमवेत त्‍यांचे कंपनी कमांडर मेजर आषुतोष हेही एक सेना मेडल गॅलंट्रीचे होते. ते हिमाचल प्रदेशचे होते आणि एक अनुभवी सैनिक होते.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

काही वर्षांमध्‍ये शेकडो भारतीय सैनिकांचे बलीदान

काश्‍मीर खोर्‍यात २०० हून अल्‍प आतंकवादी असल्‍याचे समजले जाते. असे असले, तरी पाकिस्‍तान आणि त्‍याची ‘आय.एस्.आय.’ ही गुप्‍तहेर संस्‍था काश्‍मीरमध्‍ये आतंकवाद वाढवण्‍यासाठी सैनिक पाठवत आहेत. पाकिस्‍तानला भारताची प्रगती मान्‍य नसल्‍याने तो अशा प्रकारे अडचणी निर्माण करत रहाणार आहे. त्‍यामुळे भारताला अशा प्रकारच्‍या आतंकवादी आक्रमणांशी लढण्‍यासाठी सिद्ध रहावे लागेल. काही दिवसांपूर्वी राजोरीच्‍या भागातही एक चकमक झाली होती. त्‍यात एक भारतीय सैनिक हुतात्‍मा झाला होता. त्‍याच्‍यासमवेत सैन्‍याच्‍या एका लेब्रॉडॉर डॉगचाही मृत्‍यू झाला होता. वर्ष २०१९ नंतर १२० हून अधिक भारतीय सैन्‍याधिकारी आणि सैनिक हुतात्‍मा झाले आहेत. आतंकवादीही ठार झाले; परंतु त्‍यांना ठार करतांना भारतीय सैनिकांनाही प्राण गमवावे लागलेे आहेत.

गेल्‍या ३ मासांमध्‍ये मणीपूरमध्‍ये जो हिंसाचार चालू आहे, तो थांबण्‍याचे नाव घेत नाही आहे. त्‍यामुळे चीन आणि पाकिस्‍तान भारताविरुद्ध हिंसाचार करण्‍याचा प्रयत्न चालूच ठेवणार आहेत. त्‍याविरोधात भारताला जोरदार लढावे लागेल. तसेच सामान्‍य जनतेने सैन्‍याच्‍या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. जर सैन्‍याच्‍या विरोधात कुणी बोलत असेल, तर त्‍यांचा प्रतिवाद करण्‍याचे दायित्‍व सामान्‍य जनतेचे आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.