निराधार आरोप करण्याची कॅनडाच्या पंतप्रधानांना सवय ! – अली सॅब्री, परराष्ट्रमंत्री, श्रीलंका

भारतावर आरोप केल्यावरून कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांना श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली सॅब्री यांनी सुनावले !

अली सॅब्री

कोलंबो (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी भारताचा हात असल्याच्या केलेल्या आरोपावर आता श्रीलंकेने भारताच्या बाजू घेतली आहे. श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली सॅब्री यांनी म्हटले की, दुसर्‍या महायुद्धात नाझींसाठी लढणार्‍या एका व्यक्तीचा ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत सन्मान केल्याचा व्हिडिओ मी पाहिला. त्यामुळे जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेले आरोप ऐकून मला अजिबात आश्‍चर्य वाटले नाही. ट्रुडो हे नेहमी असे खळबळजनक आणि बिनबुडाचे आरोप करत असतात. अशा प्रकारे निराधार आरोप करण्याची कॅनडाच्या पंतप्रधानांना सवयच आहे. त्यांनी असाच प्रकार श्रीलंकेच्या संदर्भातही केला होता. श्रीलंकेत वंशहत्या झाल्याचे ते म्हणाले होते; पण यात तथ्य नसल्याचे सगळ्यांना ठाऊक आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो.

परराष्ट्रमंत्री सॅब्री पुढे म्हणाले की, मला वाटते कोणत्याही देशाने इतर देशांच्या प्रकरणांत स्वतःचे नाक खुपसू नये. कोणत्याही देशाने इतर देशांना सांगू नये की, त्यांनी देश कसा चालवायला हवा ? आमचे आमच्या देशावर प्रेम आहे; म्हणून आम्ही आमच्या देशात आहोत. ‘आमचे व्यवहार कसे करावेत ?’, हे आम्हाला कुणी शिकवू नये.