चीनने भारताच्या सीमेवर केली आहेत अनेक बांधकामे !

भारतीय सैन्याच्या सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांची माहिती !

नवी देहली – गेल्या ३ वर्षांत चीनकडून भारत सीमेवर अनेक बांधकामे केली जात आहेत. गेल्या काही वर्षांत चीनने ८ सहस्र कोटी रुपये खर्च करून ३०० प्रकल्प पूर्ण केले आहेत, अशी माहिती भारतीय सैन्याच्या सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

पुढील ४-५ वर्षांत चीनला मागे टाकू !

राजीव चौधरी म्हणाले की, भारत सरकारने चीन सीमेवर रस्ते बांधण्यासाठी आर्थिक तरतूद केल्याने गेल्या ३ वर्षांत आम्ही येथे रस्त्यांची २९५ कामे केली आहेत. तसेच पूल, बोगदे आणि विमानासाठी धावपट्टी बनवली आहे. पुढील ४ मासांमध्ये आमचे ६० प्रकल्प पूर्ण होणार आहेत. आम्ही जगातील सर्वांत उंचावर रस्ता बांधला आहे. डेमचोक येथे समुद्रसपाटीपासून १९ सहस्र फूट उंचावर रस्ता बांधला आहे. आमचा विभाग अत्यंत जलद गतीने काम करून सरकारला सहकार्य करीत आहे. त्यामुळे आपण पुढील ३-४ वर्षांत चीनला मागे टाकू.

पूर्वीच्या काँग्रेस सरकारपेक्षा आताच्या सरकारने प्रकल्प पूर्ण करण्यास केले प्रोत्साहित !

राजीव चौधरी पुढे म्हणाले की, मागील काँग्रेस सरकार प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर रस्ते बनवण्यावरून द्विधास्थितीत होती. वर्ष २००८ मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री अँथनी यांना वाटत होते, ‘भारताने चीन सीमेवर रस्ते बांधले, तर चीन त्याचा वापर भारताच्या विरोधातच करील’; मात्र आजच्या सरकारने वेगळ्या पद्धतीने विचार करून आम्हाला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि देत आहे. गेल्या ६० वर्षांत येथे दोनच बोगदे बनवण्यात आले; मात्र आम्ही गेल्या ३ वर्षांत ४ बोगदे बनवले आणि सध्या १० बोगद्यांचे काम चालू आहे. पुढील वर्षापर्यंत ते पूर्ण होतील. त्यानंतर आणखी ८ बोगद्यांची योजना आहे. हिवाळ्यामध्ये बर्फ पडल्याने रस्ते बंद होतात, तेव्हा या बोगद्यांचा अधिक लाभ होणार आहे.

संपादकीय भूमिका

चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !