कर्नाटकमध्ये गोमांस घेऊन जाणार्‍या चारचाकी वाहनाला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावली आग !

पोलिसांनी ६ वाहनांतून जप्त केले १८ टन गोमांस !

बेंगळुरू (कर्नाटक) – पोलिसांनी दोड्डबळ्ळापूर येथे अनधिकृतपणे गोमांस घेऊन जाणार्‍या ७ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ वाहनांतून १८ टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. तत्पूर्वी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथे गोमांस घेऊन जाणारे वाहन रोखले होते. गोमांस आढळल्यानंतर या कार्यकर्त्यांनी या चारचाकी वाहनाला आग लावली होती. त्यानंतर पोलीस येथे पोचले. पोलिसांनी गाडीला आग लावल्याच्या प्रकरणी १४ जणांना अटक केली.

श्रीराम सेनेचे सरचिटणीस सुंदरेश नागरल यांनी ‘टोलगेट भागात पोलिसांनी गोमांस घेऊन जाणार्‍या वाहनांना जाऊ दिले होते’, असा आरोप केला. तसेच त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना अटक का करण्यात आली ?, असा प्रश्‍नही विचारला.

संपादकीय भूमिका 

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना गोतस्कर सापडतात, ते सर्व यंत्रणा असणार्‍या पोलिसांना का सापडत नाहीत ? कि ते पैसे घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतात ?