|
पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी पुणे महापालिकेने नागरिकांची मागणी नसतांना २३ सप्टेंबरपासून घाई गडबडीत कोट्यवधी रुपये खर्चून फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था केली; मात्र नागरिकांना फिरता हौद आपल्या घराजवळ, सोसायटीजवळ आल्याची माहिती देणारी व्यवस्था या वाहनांवर नाही. फिरत्या हौदांच्या मार्गाचा नकाशा उपलब्ध नसल्याने त्याची माहिती नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे ‘फिरता विसर्जन हौद आला अन् निघून गेला’, अशी अवस्था असल्याने त्यास नागरिकांचा अधिक प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे अशी व्यवस्था करण्याची अट निविदेतही दिलेली नाही.
महापालिकेकडून कोरोना महामारीच्या काळापासून फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था केली जात आहे. यंदा ही व्यवस्था न करता विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांवरच भर दिला जाणार होता; पण प्रशासनाने अचानकपणे फिरते हौद यंदाही करण्याचा निर्णय घेतला. घाई गडबडीत १५० फिरत्या हौदांसाठी २ निविदा काढल्या. या दोन्ही निविदा स्वयंभू ट्रान्स्पोर्ट या ठेकेदारास मिळाल्या आहेत. यामध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास १० ट्रक दिले आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या नावाचा फलक, लोखंडी टाकी, कामगार यांचा समावेश आहे; पण नागरिकांना याची माहिती मिळावी, अशी कोणतीही व्यवस्था महापालिकेने केलेली नाही. या फिरत्या हौदांवर ‘स्पीकर’ची व्यवस्था नसल्याने कर्मचारी ‘फिरता विसर्जन हौद आला आहे’, अशी घोषणाही करू शकत नाहीत.
महापालिकेच्या संकेतस्थळावर क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधित अधिकार्यांची नावे आणि संपर्क क्रमांक, हौदांचे प्रत्यक्ष स्थळ दिले आहे; पण त्यातूनही व्यवस्थित माहिती मिळत नाही. महापालिकेच्या फिरत्या हौदांच्या काढलेल्या निविदेत नियमांचे उल्लंघन चालू आहे. या निविदांना अद्यापही आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून मान्यता मिळालेली नाही, तरीही काम चालू झाले आहे. ही निविदा नागरिकांच्या सोयीसाठी काढली, असे सांगितले जात असले तरी त्यामध्ये ठेकेदाराने ध्वनीवर्धक आणि ध्वनीक्षेपक यांची व्यवस्था करावी, अशी अट टाकलेली नाही.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले की, अतिरिक्त आयुक्तांकडून निविदेला मान्यता मिळाली आहे. या निविदेत गाडीवर ध्वनीवर्धक आणि ध्वनीक्षेपक यांची व्यवस्था असावी याचा समावेश नाही; पण नागरिकांच्या सोयीसाठी ही व्यवस्था करण्याची सूचना ठेकेदारास करू. २४ सप्टेंबरपासून ही व्यवस्था चालू होईल.