१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट
‘ठाणे येथे वर्ष १९९३ मध्ये प.पू. डॉक्टरांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) ‘अभ्यासवर्गांची मालिका आणि उत्तम साधक कसे व्हायचे ?’, या अभ्यासवर्गांद्वारे भेट झाली. त्याआधी आम्ही सर्व जण पूजाअर्चा, स्त्रोत्रपठण, ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप लिहिणे आदी साधना म्हणून करत होतो.
२. कर्करोगाचे निदान झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आधुनिक वैद्य जसे सांगतील, तसे उपचार करून घ्या’, असे सांगणे
मला कर्करोग झाल्याचे निदान होण्यापूर्वी काहीच त्रास होत नव्हता. नोव्हेंबर १९९६ मध्ये छातीच्या डाव्या बाजूला टणक गाठ असल्याचे लक्षात आले. त्याच दिवशी आम्ही आमच्या कौटुंबिक आधुनिक वैद्यांची भेट घेतली. काही तपासण्या केल्या. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘शस्त्रकर्म करून तो भाग काढावा लागेल.’’ दुसर्या दिवशी आम्ही (मी आणि माझे यजमान, श्री. कोंडिबा जाधव) मुंबई सेवाकेंद्रात गेलो आणि प.पू. डॉक्टरांना अहवाल (‘रिपोर्ट’) दाखवले. ते पाहून त्यांनी सांगितले, ‘‘आधुनिक वैद्य जसे सांगतील, तसे उपचार करून घ्या.’’ प.पू. डॉक्टरांनी आम्हा दोघांना जेवू घातले. त्या वेळी आमचा बराच ताण न्यून झाला.
३. शस्त्रकर्म ३ वेळा केल्यानंतर प्रत्येक वेळी टाके न सुकणे
अ. डिसेंबर १९९६ मध्ये माझे पहिले शस्त्रकर्म झाले. शस्त्रकर्म करून काढलेला भाग ‘लॅब’मध्ये तपासण्यास दिला. त्याचा अहवाल ‘तिसर्या टप्प्याचा कर्करोग आहे’, असा आला. मी २० दिवस रुग्णालयामध्ये होते; परंतु शस्त्रकर्माचे टाके सुकत नव्हते. त्यानंतर टाटा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार चालू केले.
आ. काही मासांनी त्याच जागेवर आलेल्या दुसर्या कर्करोगाच्या गाठीचे शस्त्रकर्म झाले. त्या वेळीही टाके सुकत नव्हते. टाटा हॉस्पिटलमधील आधुनिक वैद्य टाके सुकण्यासाठी शिकस्त करत होते; परंतु त्यांना यश येत नव्हते. पुन्हा काही मासांनी त्याच जागेवर तिसरी गाठ आल्यावर तपासणी केली असता ‘ती चरबीची (‘फॅट’ची) होती’, असा अहवाल आला. आधुनिक वैद्यांना थोडे बरे वाटले; परंतु त्यांना लवकरात लवकर किरणोपचार (रेडिएशन) चालू करायचे होते; परंतु टाके सुकले नव्हते. आधुनिक वैद्यांनी थोडा धोका पत्करून आम्हाला कल्पना देऊन ओल्या टाक्यांवरती किरणोपचार चालू केले. ‘असे करणे अतिशय आवश्यक होते’, असे त्यांनी सांगितले. नंतर मी सलग ३१ किरणोपचार घेतले. ठाणे येथून परेल येथील टाटा हॉस्पिटलचा बस आणि रेल्वेचा प्रवास मी एकटीच करत होते. मी रुग्णालयामध्ये असतांना माझी मुलगी आणि पती यांच्या आधीच पुष्कळ सुट्या झाल्या होत्या. त्यामुळे मी एकटी जात असे. अगदीच साहाय्य लागले, तर कुटुंबीय साहाय्याला येत असत.
४. किरणोपचारासाठी येणार्या इतर रुग्णांच्या तुलनेत अल्प त्रास होणे
किरणोपचारासाठी येणार्या इतर रुग्णांना पुष्कळ त्रास होत असे. जेवण न जाणे, मळमळणे, केस गळणे, थकवा येणे यासारखे त्रास होत असत. त्यामुळे ते सलग किरणोपचार घेत नसत; पण देवाच्या कृपेने मला काही त्रास झाला नाही आणि सलग किरणोपचार घेता आले.
५. कर्करोगाचा त्रास ५ वर्षे सलग औषधे घेतल्यानंतर पूर्णपणे बरा होणे
किरणोपचाराने झालेल्या जखमा सुकायला १ मास लागला. त्या काळात नामजप चालू होता. पुढील सहा मासांमध्ये मी हळूहळू बरी झाले. पाच वर्षांनंतर औषधोपचार बंद केले. सर्व शारीरिक चाचण्या घेतल्या. सर्व अहवाल व्यवस्थित होते. आधुनिक वैद्यांना पुष्कळ आनंद झाला. शेवटी ते मला म्हणाले, ‘‘लक्ष्मीबाई, तुम अच्छी हो गई । अभी चिंता मत करो ।’’ (लक्ष्मीबाई तुम्ही बर्या झाला आहात. आता चिंता करू नका.) मी परमेश्वर आणि गुरु यांचे आभार मानले. टाटा हॉस्पिटलमधील आधुनिक वैद्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना सनातन संस्थेच्या ध्वनीफिती (‘कॅसेट’) आणि काही ग्रंथ भेट दिले. त्यानंतर प्रकृती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आणि मी पूर्वीप्रमाणे संस्थेच्या प्रसार-प्रचार कार्यामध्ये सहभागी होऊ लागले. प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच मी या मोठ्या आजारपणातून बाहेर पडले.
६. सनातन संस्थेच्या कार्यामध्ये सहभागी असणे
शस्त्रकर्म होण्याच्या अगोदर ३ वर्षे आम्ही सर्व जण संस्थेच्या कार्याशी संबंधित होतो, तसेच शस्त्रकर्माच्या काळातसुद्धा जसा वेळ मिळेल, तसे माझे पती आणि मुलगी संस्थेच्या कार्यामध्ये आपली साधना म्हणून सहभाग घेत होते.
७. स्वभाव भित्रा असूनही ३ वेळा शस्त्रकर्म होऊनही नैराश्य न येणे आणि साधनेमुळे सर्व सहन करता येणे
आरंभीला मी अतिशय भित्री होते. एवढे मोठे आजारपण त्यामध्ये ३ वेळा शस्त्रकर्म आणि जवळजवळ अडीच वर्षांचा काळ यामध्ये मला कधी नैराश्य आले नाही. सततनामजप आणि श्री गुरूंना प्रार्थना यांमुळे मला हे सहन करण्याची शक्ती मिळाली. ‘नामजपामध्ये केवढी शक्ती आहे’, याची जाणीव झाली.
८. आम्ही रुग्णालयामध्ये आजूबाजूचे रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक यांनासुद्धा नामजपाचे महत्त्व सांगून नामजप करण्यास सांगत होतो.
वरील सर्व कठीण प्रसंग घडून २७ वर्षे झाली, गुरुमाऊलीने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) सर्व प्रसंगांमध्ये स्थिर ठेवून आजपर्यंत साधनारत ठेवले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’
– सौ. लक्ष्मी जाधव, फोंडा, गोवा. (५.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |