सांगलीत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशीच महापालिकेकडून शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत !

शेरीनाल्याचे नदीत मिसळणारे पाणी !

सांगली – संस्थांच्या मूर्तींसह घरगुती श्री गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशी कृष्णा नदीत विसर्जन होते, हे ठाऊक असतांना महापालिकेच्या सांडपाणी विभागाने शेरीनाल्यातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीत सोडून दिल्याने सांगलीकरांकडून संताप व्यक्त होत आहे. विसर्जनासाठी सहस्रो सांगलीकर पाण्यात उतरत असतात. या सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे.

याविषयी महापालिका अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 सांगलीचे माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी यांनी याविषयीची छायाचित्रे आणि नदीत सांडपाणी सोडलेला व्हिडिओ प्रसारित केला आहे. २३ सप्टेंबरला सकाळी कृष्णा नदीत कोयनेचे पाणी आले असेल; म्हणून पोहण्यास आलेल्या नागरिकांना नदीत केवळ शेरीनाल्याचे पाणी आहे, हे लक्षात आल्याने त्यांनी अनेकांना पाण्यात उतरण्यापासून रोखले. पाटबंधारे विभागाने सोडलेले पाणी अद्याप सांगलीत पोचलेले नाही. त्यामुळे महापालिकेने नदीत सोडलेल्या या गटारीच्या पाण्यात कुणी पोहू नये, अशी सूचना ज्येष्ठ जलतरणपटूंकडून करण्यात आली. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी पाण्यात उतरणेही रहित केले; मात्र विसर्जनासाठी येणार्‍या नागरिकांना अशी सूचना कुणाकडूनही मिळण्याची शक्यता नसल्याने हा प्रकार म्हणजे त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा होणार आहे.