राज्यात सावधानतेची चेतावणी कायम
पणजी – २३ सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या पणजी वेधशाळेने वर्तवला आहे. आता मोसमी पावसाचा परतीचा प्रवास चालू झाला असून पुन्हा एकदा संततधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन गणेशचतुर्थीच्या काळात अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने लोकांना मूर्ती विसर्जनात अडथळा निर्माण होत आहे.
राज्यात चालू हंगामात आतापर्यंत एकूण ११८ इंच पाऊस पडला असून पावसाने सरासरी लक्ष्य पार केले आहे. गेल्या ८ दिवसांत पावसाने ही सरासरी भरून काढली असून आता पडणारा पाऊस अतिरिक्त असेल. गोव्यात केपे तालुक्यात सर्वाधिक, म्हणजे १३५ इंच पाऊस पडला. त्यानंतर सांगे तालुक्यात १३१ इंच, फोंडा तालुक्यात १२६ इंच, तर वाळपई तालुक्यात १२४ इंच पावसाची नोंद झाली. यंदा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अल्प दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात पालट झाला. आता मोसमी पावसाचा प्रभाव आणखी काही दिवस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे यंदा गोव्यात ऑक्टोबर मासातही पाऊस पडणार, असे संकेत आहेत.