कोल्हापूर – कोल्हापूर महापालिका प्रशासनाने इराणी खण येथे गतवर्षीप्रमाणे घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदु धर्मशास्त्राचा कोणताही आधार नसणार्या ‘यांत्रिक पद्धती’चा (कन्व्हेअर बेल्टचा) वापर करण्याचे ठरवले असून १५ सप्टेंबरला त्याची चाचणी घेण्यात आली. यात एका बाजूला श्री गणेशमूर्ती ठेवल्यावर त्या सरकत जाऊन पुढे खणीतील पाण्यात विसर्जित होतात. गतवर्षी ४० सहस्र श्री गणेशमूर्ती इराणी खण येथे विसर्जित झाल्या होत्या, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
अन्य घडामोडी
१. भाविकांनी पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जित करू नयेत; म्हणून प्रशासनाने नदीवर सर्व बाजूंनी ‘बॅरिकेट्स’ लावले आहेत, तसेच नदीवर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
२. एकीकडे श्री गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते, असे सांगणारे प्रशासन पंचगंगा नदीत म्हशी धुण्यासाठी कुठेच आडकाठी आणत नसल्याचे दिसून आले. १५ सप्टेंबरला अन्य दिवसांप्रमाणे नदीत म्हशीही धुतल्या जात होत्या.
३. महापालिकेच्या वतीने शहरात विविध प्रभागांमध्ये १८० विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड ठेवले आहेत. नागरिकांनी विसर्जन कुंडामध्ये विर्सजन केलेल्या श्री गणेशमूर्ती एकत्र करून चारचाकी वाहनातून वाहतूक करून त्या परत इराणी खणीमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत.
पाचव्या दिवशी श्री गणेशमूर्ती पंचगंगा नदीतच विर्सजन करण्यावर हिंदुत्वनिष्ठ ठाम !महापालिका प्रशासनाने भाविकांना श्री गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी आडकाठी आणू नये, यांसाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी कोल्हापूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. हिंदुत्वनिष्ठांनी ‘‘नदीवर विसर्जन करण्यास बंदी आहे’, असा शासनाचा आदेश असलेली प्रत दाखवा’’, तसेच अन्य काही विचारलेल्या प्रश्नांना अतिरिक्त आयुक्तांना उत्तरे देता आली नाहीत. तरी हिंदुत्वनिष्ठांनी ५ व्या दिवशी भाविक श्री गणेशमूर्ती पंचगंगा नदीतच विसर्जन करतील, असे ठामपणे सांगितले. प्रशासनाने जरी नदीघाट बंद केला असला, तरी भाविकांनी २३ सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजता विसर्जनासाठी यावे, हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांना साहाय्य करतील, असे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कळवले आहे. |