पुणे महापालिकेकडून फिरत्‍या हौदांना अद्यापही मान्‍यता नाही !

ठेकेदार ठरला; मान्‍यता अडकली सरकारी कामकाजात

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – यंदाच्‍या वर्षी फिरत्‍या हौदांची आवश्‍यकता नसतांनाही प्रशासनाने शहरामध्‍ये श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्‍या हौदांची निविदा काढली. त्‍यासाठी १ कोटी ४२ लाख रुपयांच्‍या २ निविदा काढण्‍यात आल्‍या. दोन्‍ही निविदा ‘स्‍वयंभू ट्रान्‍सपोर्ट’ यांना मिळाल्‍या; परंतु त्‍याच्‍या मान्‍यतेचा प्रस्‍ताव अजूनही स्‍थायी समितीसमोर सादर केला नाही.

या निविदांचा ठेकेदार ‘स्‍वयंभू ट्रान्‍सपोर्ट’ यांनी अद्याप महापालिकेला वाहनांचे क्रमांक, आर्.टी.ओ.चे (प्रादेशिक परिवहन मंडळ) प्रमाणपत्र, गाडीचालक, गाडीवरील अन्‍य कर्मचारी यांची नावे आदी कोणतीही माहिती दिलेली नाही.

घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे उपायुक्‍त संदीप कदम म्‍हणाले, ‘‘फिरत्‍या हौदांच्‍या निविदेचा प्रस्‍ताव मान्‍यतेच्‍या प्रक्रियेत आहे. ५ व्‍या दिवसांपासून हे हौद विसर्जनासाठी उपलब्‍ध असतील. यामध्‍ये नियमांचे पालन केले जाईल.’’