…हा तर केवळ विरोधासाठी विरोध !

प्रा. श्‍याम देशपांडे

१. ‘इंडिया’ नाव गुलामगिरीचे प्रतीक !

‘कोणतीही व्‍यक्‍ती समाज, धर्म, संप्रदाय आणि राष्‍ट्र यांची मूळ नावे कोणत्‍याही भाषेत लिहितांना त्‍या भाषेच्‍या लिपीत लिहिते; परंतु मूळ नावात कोणताही पालट होत नाही. हे साधे सरळ व्‍याकरणविरोधी पक्षांना कळून येऊ नये, याचे आश्‍चर्य वाटते. तसेच कळूनही जाणून न घेणे, अट्टहास केवळ विरोध प्रदर्शित करण्‍यासाठी आहे. १८ सप्‍टेंबरपासून संसदेचे ५ दिवसांचे विशेष अधिवेशन चालू आहे. त्‍यात देशाचे ‘इंडिया’ नाव पालटून ‘भारत’असे नामाभिधान कायम करण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने हा निर्णय बहुमताने पारित केला, तर ब्रिटिशांच्‍या आगमनानंतर भारतियांच्‍या मानसिक गुलामीचे फार मोठे प्रतीक कायमचे पुसले जाणार आहे. त्‍यामुळे हा निर्णय या देशावर प्रेम आणि निष्‍ठा ठेवणार्‍या समस्‍त नागरिकांसाठी अभिमानास्‍पदच ठरणार आहे.

२. भाषेनुसार कोणत्‍याही नावात पालट होत नाही !

देशाच्‍या कोणत्‍याही भाषेतील प्राचीन साहित्‍यामध्‍ये ‘भारत’, तर काही ठिकाणी ‘आर्यावर्त’असाच उल्लेख आढळून येतो. तेथे कुठेही ‘इंडिया’ असा नामोल्लेख आढळत  नाही; कारण भारत हीच आपली सांस्‍कृतिक ओळख आहे. ब्रिटिशांनी केवळ समाजासाठीच  ‘फोडा आणि झोडा’, या नीतीचा उपयोग केला नाही, तर या देशाच्‍या नावावरही आघात केला आहे. जो स्‍वातंत्र्यानंतरही ७६ वर्षे आपण जोपासत आहोत. वास्‍तविक स्‍वातंत्र्याच्‍या पहिल्‍या स्‍वातंत्र्यदिनीच ही गोष्‍ट होणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. सध्‍याचे सरकार तो निर्णय घेईल, असे वाटत आहे. त्‍याचे सर्व भारतियांनी स्‍वागत केले पाहिजे. ‘भारत’ नावाला विरोध करणारे काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि शशी थरूर यांना प्रश्‍न विचारू इच्‍छितो, ‘तुमचे नाव आंग्‍ल भाषेत लिहितांना आणि उच्‍चारतांना जसे आहे, तसेच लिहिले जाईल कि शशीचे ‘शाडूलनी’ आणि जयरामचे ‘जाडुलणी’ होईल ? तसे होणार नसेल, तर देशाच्‍या मूळ नावाविषयी तुमचा आक्षेप निरर्थक नाही का ? नाम हे नामच रहाते. त्‍यासाठी परिवर्तित उपनामाचा उपयोग करणे चुकीचे आहे.

पंतप्रधान मोदी यांच्‍या विरोधात उभ्‍या ठाकलेल्‍या आघाडीने त्‍यांचे नाव ‘इंडिया’ ठेवले, तरी चालेल. त्‍याचा या देशाच्‍या नावाशी काहीही संबंध नाही. एकंदरीत सर्व साकल्‍याने विचार केल्‍यास विरोधकांचा केवळ विरोधासाठी विरोध दिसून येतो. हे सरकार त्‍यांच्‍या दबावाखाली फसणार नाही. सरकारने या अधिवेशनामध्‍ये या मायभूमीचे ‘भारत’हे नाव शाश्‍वत स्‍वरूपी निश्‍चित करावे आणि देशाच्‍या इतिहासात एक सुवर्णमयी पान जोडावे. त्‍यामुळे समस्‍त राष्‍ट्रप्रेमींचा अभिमान उंचावेल, यात संशय नाही.

३. मातृभूमीचे खरे भक्‍त ‘भारत’ नावाचे स्‍वागत करतील !

स्‍वातंत्र्यानंतर पाकिस्‍तानच्‍या निर्मितीमुळे या देशाला ‘हिंदुस्‍थान’ म्‍हटले गेले, असे  काही अभ्‍यासक म्‍हणत असले, तरी तेही त्‍यालाही अनेक नावे आहेत; कारण अनेक ग्रंथांमध्‍ये या देशात आलेल्‍या परकीय अभ्‍यासक प्रवाशांनी ‘सिंधुस्‍थान’, ‘सप्‍तसिंधव’, ‘हप्‍तहिंदु’ यांसारखे अनेक उल्लेख केल्‍याचे पुरावे आहेत; पण हिंदुस्‍थान म्‍हटले, तर अनेकांच्‍या पोटात आणि छातीत तात्‍काळ कळा निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. याखेरीज ज्‍यांना हिंदुस्‍थान म्‍हणायचे ते म्‍हणतात, बोलतात आणि लिहितातही. हे राज्‍यघटनेने त्‍यांना दिलेले अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य आहे. त्‍यामुळे त्‍याचा आग्रह नाही; परंतु ‘भारत’ नावाला मात्र कुणाचाच विरोध रहाता कामा नये; कारण ‘भारत’ नाव हे अर्थपूर्ण आहे, तसे ‘इंडिया’या नावाचे नाही.

‘भा’ म्‍हणजे भक्‍ती, भाग्‍य किंवा तेज आणि रत म्‍हणजे रमणारा. त्‍यामुळे भाग्‍यमय भक्‍तीच्‍या तेजस्‍वी भावनेत नित्‍य रममाण होऊन रहाणारा आणि त्‍यातच रमलेला देश, म्‍हणजे भारत !’ त्‍यामुळे विरोधक जर मातृभूमीचे खरे रक्षक आणि भक्‍त असतील, तर ते सरकारच्‍या निर्णयाचे समर्थन करतील. ‘मदर इंडिया’ असे म्‍हणणे, हा मातृभूमीचा अवमानच नाही, तर विटंबना आहे. ही विटंबना देशाचे तुकडे केल्‍यानंतर झाली आहे. आता परत ते पाप त्‍यांनी करू नये, ही प्रार्थना ! ही भूमी केवळ सत्ताधारी भाजपचीच माता आहे आणि अन्‍य कोणत्‍याही पक्षांची नाही, असे नाही.’

– प्रा. श्‍याम देशपांडे, वर्धा (१८.९.२०२३)