ईश्‍वर, धर्म आणि आधुनिक विज्ञान

‘उपनिषदांप्रमाणे ईश्‍वर या शब्‍दाने कोणत्‍याही मानवी आकृतीचा बोध होत नसून ‘ईश (सत्ता) म्‍हणजे अशी एक शक्‍ती की, जी सर्व चराचरांना व्‍यापून आहे आणि जिच्‍यामुळे जिवांमध्‍ये जिवंतपणा दिसतो.’ आजचे प्रगत विज्ञानही मानते की, दिसणार्‍या अगर भासणार्‍या वास्‍तविकतेच्‍या ‘मागे’ काहीतरी न पालटणारे, न मोजता येणारे, असे तत्त्व असावे. स्‍वामी विवेकानंद आणि इतरही सहस्रो माहात्‍मे यांचा हा ‘अनुभव’ आहे की, त्‍या सर्वांभूती वास करणार्‍या तत्त्वाचा (ज्‍याला ‘ब्रह्म’ म्‍हणतात) अनुभव घेता येतो. एवढेच नव्‍हे, तर या तत्त्वाचा अनुभव घेणे हेच फक्‍त मानवी जीवनाचे ध्‍येय असू शकते. म्‍हणूनच विवेकानंद पुनः पुनः एकच गोष्‍ट सांगतात, ‘धर्म / ईश्‍वर ही चर्चा, वादविवाद करण्‍याची गोष्‍ट नाही.’ यामुळे सर्वसामान्‍यांना असा प्रश्‍न पडतो की, वैज्ञानिकांना त्‍यांच्‍या जीवनात / प्रयोगशाळेत कधी असे अनुभव येतात का की, ज्‍यांचे स्‍पष्‍टीकरण केवळ भौतिक सिद्धांतांनी करता येत नाही ? यावर असे दिसते की, अनेक जीवशास्‍त्रज्ञ, मानववंशशास्‍त्रज्ञ, तंत्रज्ञ इत्‍यादींनी या दृष्‍टीने फार उद़्‍बोधक अनुभव आणि निरीक्षणे ग्रंथित करून ठेवली आहेत. एवढेच नव्‍हे, तर अनेकांनी त्‍यावर आधारित सृष्‍टीचलनाविषयीचे सिद्धांत मांडलेले आहेत आणि धर्म अन् ईश्‍वर यांविषयीही अभिप्राय ठिकठिकाणी नोंदलेले आहेत.

सर्वसामान्‍यपणे जडवाद असे मानतो की, आपण ज्‍याला विचार, मन, बुद्धी इत्‍यादी म्‍हणतो, त्‍याचे उगमस्‍थान माणसाचा मेंदू आहे. मेंदू कोट्यवधी ज्ञानपेशींनी (न्‍यूरॉन्‍स) बनलेला असतो आणि त्‍यांचे कार्य विद्युत् संदेशप्रणालीप्रमाणे चालते. या पेशींखेरीज मेंदूचे कोणतेही कार्य नीट चालणार नाही. या कल्‍पनेला लॉर्बर नावाच्‍या न्‍यूरॉलॉजिस्‍टने प्रथम धक्‍का दिला. एका सर्वसाधारण माणसापेक्षा मोठे डोके असलेल्‍या विद्यार्थ्‍याच्‍या मेंदूची स्‍कॅनने तपासणी केली. त्‍याला आढळले की, इतर सामान्‍य विद्यार्थ्‍यांप्रमाणेच असणार्‍या त्‍या मुलाच्‍या कवटीमध्‍ये मेंदू नावाची गोष्‍ट नव्‍हतीच. लॉर्बरला आश्‍चर्याचा धक्‍का बसला. रॉजर लेविन नावाच्‍या डॉक्‍टरनेही त्‍यांच्‍या याविषयीच्‍या अनुभवाची सत्‍यता लिहून ठेवली आहे. अगदी कमी मेंदू असलेल्‍या ६०० मुलांच्‍या अभ्‍यासात त्‍यांना असे दिसून आले की, ९० टक्‍क्‍यांपर्यंत मेंदूपेशी नसलेल्‍या मुलांमधे ५० टक्‍के मुलांचा बुध्‍यांक (IQ) १०० च्‍यावर होता. या सर्व गोष्‍टींचे स्‍पष्‍टीकरण डॉक्‍टर आणि जीवशास्‍त्रज्ञ यांना अजून तरी समाधानकारक असे सापडलेले नाही.’

(साभार : मासिक ‘जीवन-विकास’, ऑक्‍टोबर १९९३)