अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार देवाची योग्‍य आरती म्‍हणा !

आपल्‍याकडे उत्‍सवांच्‍या वेळी आरती करण्‍याची पद्धत आहे. आरतीमध्‍ये संबंधित देवतेची स्‍तुती केलेली असते. ‘आरतीच्‍या माध्‍यमातून देवतेची स्‍तुती केली की, देवता आपल्‍यावर कृपा करतात’, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. देवतेची कृपा तेव्‍हाच होणार, जेव्‍हा आरती तळमळीने, आर्ततेने आणि अध्‍यात्‍मशास्‍त्रीयदृष्‍ट्या योग्‍य रितीने म्‍हटली जाईल. सध्‍या ‘असे’ अभावानेच आढळते. उलट अलीकडे आरती म्‍हणतांना चढाओढ होत असल्‍याचे आढळते. काही जण ‘जय देव, जय देव’ तेही मोठ्या आवाजात म्‍हणण्‍यापुरतेच तोंड उघडतात.

अनेकांकडून आरतीतील मूळ शब्‍द न म्‍हणता अयोग्‍य शब्‍द म्‍हटले जातात. उदाहरणार्थ श्री गणेशाच्‍या आरतीमधील ‘लंबोदर पितांबर …’ या ओळीतील ‘फणिवरबंधना’ याऐवजी ‘फळीवर वंदना’, ‘संकटी पावावे’, याऐवजी ‘संकष्‍टी पावावे’; शंकराच्‍या आरतीमधील ‘लवथवती’च्‍या ऐवजी ‘लवलवती’, ‘कर्पूरगौरा भोळा …’ यातील ‘नयनी विशाळा’ ऐवजी ‘नेमेनी शाळा’ असे चुकीचे म्‍हटले जाते. काही जण आरतीमध्‍ये अतिरिक्‍त शब्‍दांचा वापर करून आरतीचे विडंबन करतात. उदाहरणार्थ शंकराच्‍या आरतीमध्‍ये ‘आरती ओवाळू’ला जोडून ‘भावार्थी ओवाळू’, श्री गणपतीच्‍या आरतीमधील ‘जय देव जय देव …’मधील ‘जय मंगलमूर्ती’ला जोडून ‘हो श्री मंगलमूर्ती’, विठोबाच्‍या आरतीमधील ‘पंढरीचा महिमा’ला जोडून ‘द्वारकेचा महिमा’ म्‍हणतात. काही ठिकाणी आरती झाल्‍यानंतर प्रसाद म्‍हणून पेढे, लाडू यांसारखे सात्त्विक पदार्थ न देता वडा-पाव, मिसळ यांसारखे रज-तमात्‍मक पदार्थ दिले जातात.

हिंदूंनो, अशा प्रकारे केलेल्‍या आरतीने देवतांची अवकृपाच ओढावून घेण्‍यासारखे होईल. हे टाळण्‍यासाठी आरती अध्‍यात्‍मशास्‍त्रीयदृष्‍ट्या योग्‍य रितीने आणि आर्ततेने करून संबंधित देवतेची कृपा संपादन करा !

– श्री. श्रीकृष्‍ण नारकर, पाचल, तालुका राजापूर, जिल्‍हा रत्नागिरी.

संपादकीय भूमिका

हिंदूंनो, आरती अध्‍यात्‍मशास्‍त्रीयदृष्‍ट्या योग्‍य रितीने आणि आर्ततेने करून संबंधित देवतेची कृपा संपादन करा !