सांगली प्रशासनाच्‍या नियोजनशून्‍यतेमुळे गणेशभक्‍तांसमोर विसर्जनाच्‍या वेळी ‘विघ्‍न’ !

  • पाटबंधारे विभागाकडून भाविकांची अक्षम्‍य हेळसांड

  • कृष्‍णा नदीत केवळ १ फूट पाणी

आयुर्विन पुलाच्‍या खांबांजवळील नदीतील आटलेले पाणी

सांगली, २० सप्‍टेंबर (वार्ता.) – सांगली जिल्‍ह्यात पावसाने मारलेली दडी आणि पाटबंधारे विभागाने केलेले अक्षम्‍य दुर्लक्ष यांमुळे सांगलीत कृष्‍णा नदीत २० सप्‍टेंबरला केवळ १ फूट पाणी होते. नदीतील न्‍यून पाण्‍याची स्‍थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्‍याचे पत्र दिले होते; मात्र सायंकाळपर्यंत ते पाणी नदीत पोचले नव्‍हते. यामुळे दीड दिवसांच्‍या श्री गणेशमूर्तींचे विर्सजन करतांना भाविकांसमोर अडचणींचा डोंगर उभा होता. यामुळे काही भाविकांनी इच्‍छा नसतांनाही नाईलाजास्‍तव घरी किंवा विसर्जनकुंडांत विसर्जन केले.

महापालिकेने श्री गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी उभारलेले कुंड

१. पावसाळा चालू झाल्‍यानंतर सांगली आणि सातारा जिल्‍ह्यांत म्‍हणावा असा पाऊस झाला नाही. त्‍यात सांगली जिल्‍ह्यात तर पावसाने मोठ्या प्रमाणात दडी मारली. त्‍यामुळे दिवसेंदिवस नदीपात्रातील पाणी अल्‍प होत गेले.

२. नदीपात्रात पाणी इतके अल्‍प झाले आहे की, बंधार्‍याजवळ नदीपात्र कोरडे पडले असून वाळू दिसत आहे, तसेच आयुर्विन पुलाच्‍या खांबाजवळ पाणी साचल्‍याने पाण्‍याला दुर्गंधी येत आहे.

३. पाणी अल्‍प होणार आणि दीड दिवसांच्‍या श्री गणेशमूर्तींचे विसर्जनाचा दिवस हे लक्षात घेता वास्‍तविक पाटबंधारे विभागाने पाच दिवसांपूर्वीच पाणी सोडणे अपेक्षित होते; मात्र महापालिका प्रशासनाने पत्र दिल्‍यानंतर त्‍यांना जाग आली. याच समवेत बंधार्‍यांमधून होणारी गळती आणि अन्‍य समस्‍या यांवर वर्षभर उपाययोजना न काढल्‍यानेही नदीत पाणी अल्‍प आहे.

अन्‍य घडामोडी

१. शहरात कृष्‍णा नदीत मुख्‍य विसर्जन होते, तिथे महापालिकेने विसर्जन कुंडांची व्‍यवस्‍था केली असून संपूर्ण महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विसर्जनकुंड ठेवले आहेत. प्रशासनानच्‍या वतीने मूर्तीदानाचा कक्ष करण्‍यात येणार असून मिरज शहरात गणेश तलावानजिकही मूर्तीदानाचा कक्ष करण्‍यात आला आहे. यंदाच्‍या वर्षी महापालिका प्रशासनाच्‍या वतीने ‘श्री गणेशमूर्ती विसर्जन कुंड’, तसेच ‘निर्माल्‍य कलश’ यांची संख्‍या वाढवण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. (श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्‍य धर्मशास्‍त्रानुसार वहात्‍या पाण्‍यात विसर्जन केल्‍यास त्‍यातील श्री गणेशतत्त्वाचा लाभ सर्वांना होतो. श्री गणेशमूर्तीदान करणे अशास्‍त्रीय आहे, तसेच दान घेतलेल्‍या मूर्तींची अयोग्‍य पद्धतीने विल्‍हेवाट लावली जाते आणि यातून श्री गणेशमूर्तींचा अवमान होते, हा अनुभव आहे ! त्‍यामुळे हिंदूंनी, श्री गणेशाची कृपा संपादन करण्‍यासाठी श्री गणेशाची पूजा करून त्‍यामध्‍ये देवत्‍व आलेल्‍या श्री गणेशमूर्तीचे दान करू नये ! – संपादक)

२. नदीत पाणी अल्‍प असण्‍यासमवेत नदी अस्‍वच्‍छही आहे. नदीत मोठ्या प्रमाणात कचरा असून महापालिका प्रशासन त्‍याकडे कधी लक्ष देणार आहे ? असा प्रश्‍नही भाविकांनी उपस्‍थित केला आहे.

तरीही भाविकांनी मार्ग काढत जिथे पाणी आहे, त्‍या भागात नदीच्‍या पाण्‍यात विसर्जन केले.

प्रतिक्रिया

१. श्री. संजय चव्‍हाण, अध्‍यक्ष, विसावा मंडळ – वर्ष २००५ पासून ही समस्‍या असून त्‍या वेळेपासून आम्‍ही महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांना या संदर्भात सांगत आहोत. प्रत्‍येक वर्षी पाटबंधारे विभाग सांगलीतील कोल्‍हापूर पद्धतीच्‍या बंधार्‍याच्‍या फळ्‍या काढते, त्‍यामुळे पाणी वाहून गेल्‍याने नदीत पाणी रहात नाही. नदीत पाणी अल्‍प होण्‍यास महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांच्‍यातील समन्‍वयाचा अभावही कारणीभूत आहे. नदीतील पाणीही सध्‍या स्‍वच्‍छ नसल्‍याने भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कुठे करायचे ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

२. श्री. राकेश दड्डणावर, निर्धार फाऊंडेशन – प्रत्‍येक वर्षी ‘निर्धार फाऊंडेशन’च्‍या वतीने नदीची स्‍वच्‍छता केली जाते. भाविकांनी दीड, पाच आणि सात दिवसांच्‍या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्‍यानंतर आम्‍ही स्‍वच्‍छता मोहीम राबवतो त्‍याप्रमाणे यंदाही २४, २५ आणि २९ सप्‍टेंबरला आमचे कार्यकर्ते नदी स्‍वच्‍छ करतील.