कार्ला (पुणे) येथील ‘एकवीरादेवी देवस्‍थान’ न्‍यासातील २ संचालक हे देवीचे खरे भक्‍त असावेत !

संचालक निवडीच्‍या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे आदेश !

कार्ला (पुणे) येथील ‘एकवीरादेवी देवस्‍थान’

पुणे – जिल्‍ह्यातील मावळ तुलक्‍यातील कार्ला येथील प्रसिद्ध ‘एकवीरादेवी देवस्‍थाना’तील २ संचालकांची निवड ही गुप्‍त पद्धतीने करावी. ही निवड करतांना कोणतीही गुन्‍हेगारी आणि राजकीय पार्श्‍वभूमी नसेल, याची निश्‍चिती करा. हे संचालक देवीचे खरे भक्‍तच असावेत, असा मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निकालाला सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍थगिती देण्‍यास नकार दिला. मुंबई उच्‍च न्‍यायालयाने २४ ऑगस्‍ट या दिवशी वरील निकाल दिला होता. त्‍याला सर्वोच्‍च न्‍यायालयामध्‍ये आव्‍हान देण्‍यात आले होते. त्‍याविषयी नुकतीच सुनावणी झाली. ही सुनावणी न्‍या. ए.एस्. बोपन्‍ना आणि पी.एस्. नरसिंह यांच्‍या खंडपिठासमोर झाली. ‘एकवीरादेवी देवस्‍थान’च्‍या न्‍यासामध्‍ये ७ संचालक असतात. त्‍यांतील २ संचालकांची निवड ही भक्‍तांकडून करण्‍यात येत असते. ‘ते भाविक असावेत’, असा न्‍यासाच्‍या घटनेमध्‍ये उल्लेख आहे; परंतु या प्रक्रियेमध्‍ये राजकीय नेते, गुन्‍हेगारी वृत्तीच्‍या लोकांची, तसेच प्रचंड दबावातून ही निवड करण्‍यात येते. त्‍यामध्‍ये आर्थिक व्‍यवहार होतात. हे लक्षात आल्‍यानंतर मुंबईतील भक्‍त चेतन पाटील यांनी याविषयी मुंबई उच्‍च न्‍यायालयामध्‍ये अर्ज केला होता. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालाविरोधात नवनाथ देशमुख यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयामध्‍ये अर्ज केला होतो.