लोकसभा आणि विधानसभा यांसाठी महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक सादर

संसदेच्या नवीन इमारतीमध्ये कामकाजाला प्रारंभ

महिलांना ३३ टक्के जागा आरक्षित

नवी देहली – जुन्या संसद भवनातून सर्व खासदार नवीन संसद भवनात पायी चालत पोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्वांना मार्गदर्शन केल्यानंतर कामकाजाला प्रारंभ झाला. या वेळी कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत १२८ वे घटनादुरुस्ती विधेयक सादर केले. ‘नारी शक्ती वंदन’ या नावाने सादर करण्यात आलेल्या विधेयकामध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांसाठी महिलांना ३३ टक्के जागा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकावर उद्या, २० सप्टेंबरला चर्चा होणार आहे. हे विधेयक संमत झाल्यावर लोकसभेत महिलांची संख्या १८१ होणार आहे.

सध्या लोकसभेत ८२ महिला खासदार आहेत. या अधिवेशनात हे विधेयक संमत जरी झाले, तरी वर्ष २०२४ च्या निवडणुकीत त्याची कार्यवाही होण्याची शक्यता नसल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे; कारण सीमांकनानुसारच ते लागू करता येऊ शकते. जणगणनेनंतरच सीमांकन करण्यात येईल. हे दोन्ही निवडणुकीपूर्वी शक्य नाही.