युक्रेन-रशिया युद्धात गुप्तपणे शस्त्रे पुरवल्याने पाकला मिळाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून साहाय्यता निधी !

‘द इंटरसेप्ट’च्या अहवालात दावा !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून साहाय्यता निधी (‘बेलआउट पॅकेज) मिळवण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेला गुप्तपणे शस्त्रे विकली होती, असा दावा ‘द इंटरसेप्ट’च्या अहवालात करण्यात आला आहे. यात म्हटले आहे, ‘पाकिस्तानने गुप्तपणे शस्त्रे पुरवली होती. युद्धाच्या काळात रशियाशी लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्याने त्यांचा वापर केला होता.’ यातून रशिया आणि युक्रेन युद्धात पाकिस्तानचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येते.

दीर्घकाळ चालणार्‍या युद्धासाठी आवश्यक युद्धसामुग्रीचे उत्पादन केंद्र म्हणून पाकिस्तानची ओळख आहे. विशेष म्हणजे, शस्त्रास्त्रांच्या तीव्र टंचाईचा सामना करणार्‍या युक्रेनकडून पाकिस्तानी बनावटीच्या दारूगोळ्याचा वापर करण्यात आल्याचे संकेत यापूर्वीच समोर आले होते.

पाकिस्तानच्या सैन्यातील सूत्राने ‘द इंटरसेप्ट’ला काही तपशील दिले. त्यात या वर्षाच्या प्रारंभी शस्त्रास्त्र व्यवहारांचा तपशील देण्यात आला होता. त्या कागदपत्रांनुसार अमेरिका आणि पाकिस्तान यांनी वर्ष २०२२ च्या उन्हाळ्यापासून वर्ष २०२३ च्या वसंत ऋतूपर्यंत युद्धसामुग्रीची विक्री करण्यास सहमती दर्शवली.

संपादकीय भूमिका

जर हे सत्य असेल, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कुणाच्या आदेशावरून काम करते, हे स्पष्ट होते !