सेवाभावी, इतरांना साहाय्‍य करणार्‍या आणि गुरूंवर दृढ श्रद्धा असणार्‍या सोलापूर येथील ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी !

आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी

१. आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी यांची झालेली पहिली भेट

१ अ. सेवाकेंद्रात वस्‍तू आणि वह्या घ्‍यायला येणे : आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी माझ्‍या ७ – ८ वर्षांपासून संपर्कात आहेत. त्‍या त्‍यांच्‍या मुलीला घेऊन सेवाकेंद्रात वस्‍तू आणि वह्या घ्‍यायला यायच्‍या. तेव्‍हा मी सेवाकेंद्रात सेवेला होते. ‘नंतर त्‍या मला भ्रमणभाषवरून ‘आहात का ?’, असे विचारून सेवाकेंद्रात यायच्‍या.

१ आ. प्रथम साप्‍ताहिक आणि नंतर दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होणे : एकदा अचानक त्‍यांचा मला भ्रमणभाष आला. तेव्‍हा मी सेवाकेंद्रात जात नव्‍हते. त्‍यांना मी घरचा पत्ता सांगितला. त्‍या घरी आल्‍या. तेव्‍हापासून त्‍यांचे साहित्‍य घेण्‍यासाठी घरी येणे होत होते. मी त्‍यांना प्रथम साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार केले आणि त्‍यानंतर त्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या वर्गणीदार झाल्‍या. त्‍या अर्पण आणि विज्ञापन देत होत्‍या.

श्रीमती आशा दसाडे

२. आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी यांनी वेळोवेळी केलेले साहाय्‍य

२ अ. त्‍यांनी एका साधिकेचे शस्‍त्रकर्म केले आणि ते यशस्‍वी झाले.

२ आ. मुलीच्‍या बाळंतपणाच्‍या वेळी आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी यांच्‍या माध्‍यमातून देवाने साहाय्‍य करणे अन् ‘त्‍यांच्‍या रूपाने देवाने बहीण दिली’, असे वाटणे : ‘माझ्‍या मुलीचे बाळंतपण त्‍या ज्‍या रुग्‍णालयात सेवा करतात, तेथे होईल का ?’, असे मी त्‍यांना विचारले. तेव्‍हा त्‍या लगेच ‘हो’ म्‍हणाल्‍या. त्‍या वेळी त्‍यांनी मला पुष्‍कळ साहाय्‍य केले. मला बहीण नाही. तेव्‍हा देवाने ‘त्‍यांच्‍या रूपात एक बहीण दिली’, असे वाटले. देव मला त्‍यांच्‍या माध्‍यमातून साहाय्‍य करत होता. तेव्‍हापासून त्‍यांची आणि माझी जवळीक वाढली.

२ इ. कठीण परिस्‍थितीत साहाय्‍य करणे : एकदा माझ्‍या मुलीला ताप येत होता. तिची कुठल्‍याही रुग्‍णालयात तपासणी करत नव्‍हते. त्‍यामुळे मला ताण आला. तेव्‍हा सौ. वृंदाताईंनी साहाय्‍य केले. ‘ही गुरूंचीच कृपा आहे’, असे मला वाटले. त्‍या वेळी ‘त्‍यांच्‍या माध्‍यमातून देवच भेटला’, असे मला वाटले.

३. स्‍थिर

वर्ष २०१९ मध्‍ये दिवाळीत त्‍यांचे यजमान पुष्‍कळ रुग्‍णाईत होते. तेव्‍हा मी त्‍यांना भेटायला गेल्‍यावर त्‍या मला पुष्‍कळ स्‍थिर दिसल्‍या. तेव्‍हा ‘त्‍यांची आंतरिक साधना चालू असून त्‍याची गुरूंवर दृढ श्रद्धा आहे’, हे माझ्‍या लक्षात आले.

४. त्‍यांना कधीही विज्ञापन आणि अर्पण देणे, पंचांग अन् आकाशकंदील प्रायोजित करणे, यांसाठी सिद्ध असतात. 

– श्रीमती आशा दसाडे, सोलापूर (१०.६.२०२०)

६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी घोषित झाल्‍यावर आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी यांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत !

५.६.२०२० या दिवशी आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी यांची आधात्मिक पातळी ६२ टक्‍के झाल्‍याचे घोषित करण्‍यात आले. तेव्‍हा त्‍यांचा सत्‍कार केल्‍यावर त्‍यांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत येथे दिले आहे.

१. गुरुमाऊलीने अनुभवायला दिलेला आनंदाचा क्षण : ‘आज मी आयुष्‍यातील शांतीचा अनुभव घेत आहे. ‘गुरुमाऊलींनी मला या आध्‍यात्मिक पातळीपर्यंत पोचवले’, याचा मला पुष्‍कळ आनंद झाला आणि मला कृतज्ञता वाटत आहे. गेल्‍या १० ते १५ वर्षांत माझ्‍या जीवनात अनेक प्रसंग घडले. ‘प्रत्‍येक प्रसंगात गुरुमाऊलीने मला कसे शिकवले ? कसे पुढे नेले ?’, याचे मला स्‍मरण झाले. ‘सतत शिकण्‍याची वृत्ती ठेवणे, स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे अन् गुणसंवर्धन करणे’, ही सूत्रेच माणसाला सुरक्षित ठेवतात’, हे मी प्रत्‍यक्ष अनुभवते.

२. गुरूंवरील श्रद्धा 

२ अ. गुरूंवर श्रद्धा ठेवल्‍यास ते आपली उन्‍नती करून घेणार असणे आणि आज ते प्रत्‍यक्ष अनुभवणे : माझ्‍या मनात कधीतरी विचार यायचा, ‘मी इतके दिवस सनातन सांगत असलेली साधना करत आहे. तेव्‍हा माझी आध्‍यात्मिक पातळी किती असू शकते ?’ तेव्‍हा मला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये छापून आलेली चौकट आठवली. त्‍यात लिहिले होते, ‘साधकांनी स्‍वतःच्‍या आध्‍यात्मिक पातळीचा विचार न करता गुरूंवर श्रद्धा ठेवावी. ते आपली उन्‍नती करून घेतील.’ आज मी ते प्रत्‍यक्ष अनुभवत आहे.

२ आ. कोरोना महामारीमुळे उद़्‍भवलेल्‍या गोंधळाच्‍या परिस्‍थितीत साधकांचे दायित्‍व समर्थपणे निभावणे आणि गुरूंची विशेष कृपादृष्‍टी असल्‍याविना हे शक्‍य नसणे : कोरोना महामारीमुळे उद़्‍भवलेल्‍या गोंधळाच्‍या परिस्‍थितीत मी आणि माझे यजमान साधकांचे दायित्‍व समर्थपणे निभावत आहोत. ‘आम्‍ही दोघेही स्‍थिर राहून साधकांची शारीरिक आणि मानसिक स्‍थिती कशी चांगली राहील ?’, याकडे लक्ष देतो. हे सर्व गुरूंची विशेष कृपादृष्‍टी असल्‍याविना अशक्‍य आहे.

. यजमानांचा साधनेच्‍या प्रवासात मोलाचा वाटा असणे : माझ्‍या यजमानांचा माझ्‍या साधनेच्‍या प्रवासात मोलाचा वाटा आहे. आताही माझ्‍या आध्‍यात्मिक प्रगतीची गोड वार्ता त्‍यांना सांगितल्‍यावर त्‍यांना आनंद झाला. ‘माझा चांगल्‍या कार्याला नेहमी पाठिंबाच आहे’, असे ते म्‍हणाले.’

– आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी, सोलापूर (५.६.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक