साधकत्‍वाचे गुण असलेले आणि परात्‍पर गुरुदेवांप्रती भाव असलेले श्री. कृष्‍णत माने यांची त्‍यांची पत्नी सौ. जया माने हिला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

श्री. कृष्‍णत माने आणि त्‍यांची पत्नी सौ. जया माने यासारखे कोणी समाजात असेल, याची कल्‍पनाही करता येत नाही. सौ. जया माने यांच्‍या लेखावरून त्‍या दोघांची वैशिष्‍ट्ये समजली. त्‍यांच्‍या वैशिष्‍ट्यांबद्दल त्‍यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे ! त्‍या दोघांची साधनेत जलद गतीने प्रगती होईल, हे निश्‍चित आहे !’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२४.४.२०२३)

१. विवाहानंतर साधना आणि सेवा चालू केल्‍यावर श्री. कृष्‍णत (टीप) माने यांच्‍यात केवळ गुरुकृपेने झालेले पालट

(टीप : कृष्‍णत हे नाव कृष्‍णाचे नाव समजूनच ठेवण्‍यात आले आहे. आमच्‍या गावात असे अनेक जणांचे नाव ठेवले आहे.)

श्री. कृष्‍णत माने

१ अ. साधिकेच्‍या घरातील नामपट्‍ट्यांचे छत पाहून श्री. कृष्‍णत यांना घराचे जाणवलेले वेगळेपण : ‘श्री. कृष्‍णत हे मला पहाण्‍यासाठी प्रथमच आमच्‍या घरी आले होते. तेव्‍हा माझ्‍याशी बोलतांना ते मला म्‍हणाले, ‘‘तुमच्‍या घरात आल्‍यावर वेगळे वाटते. मला येथे एक वेगळीच शांतता जाणवली. अशी शांतता मी अनेकांच्‍या घरी जाऊनही कुठेच अनुभवलेली नाही. तुम्‍ही भिंतीवर देवतांच्‍या ज्‍या नामपट्‍ट्या (नामपट्‍ट्यांचे छत) लावल्‍या आहेत, त्‍यांकडे पाहून चांगले वाटते. आपोआप नामजप चालू होतो.’’

गुरुदेव, आपण आम्‍हा साधकांसाठी बनवलेली प्रत्‍येक वस्‍तू मग ते नामपट्‍ट्यांचे छत असो कि देवतांची सात्त्विक चित्रे असोत, तीसुद्धा चैतन्‍याचा वर्षाव करतात. त्‍या सात्त्विकतेची, चैतन्‍याची अनुभूती समाजातील साधना न करणार्‍या जिवालाही आपणच दिलीत. हे केवळ आपल्‍याच कृपेमुळे घडू शकते.

१ आ. राग न्‍यून होणे : श्री. कृष्‍णत हे जास्‍त रागीट स्‍वभावाचे होते. त्‍यांना राग आल्‍यानंतर त्‍या २ ते ३ मिनिटांमध्‍ये जर एखाद्याने उलट उत्तर दिले, तर ते काय करतील, याचा काही नेम नव्‍हता. त्‍यामुळे त्‍यांचे आई-बाबा त्‍यांच्‍याशी काहीही बोलतांना विचारपूर्वक किंवा घाबरूनच बोलायचे. (कृष्‍णत यांची आईचे निधन झाले असून आता त्‍यांना सावत्र आई आहे.) विवाहानंतर मीसुद्धा काही दिवस त्‍यांना घाबरायचे. त्‍यानंतर मी हळूहळू देवालाच प्रार्थना करून त्‍यांना त्‍यांच्‍या चुकांची जाणीव करून देऊ लागले. ‘आपल्‍या बोलण्‍यामुळे इतर कसे दुखावले जातात’, हेे मी त्‍यांना सांगितले. आरंभी त्‍यांना ते स्‍वीकारता येत नव्‍हते.

त्‍यानंतर काही दिवसांनी त्‍यांना स्‍वतःहून याची जाणीव झाली. ते मला म्‍हणाले, ‘‘मला आजपर्यंत कुणीच माझ्‍या चुका दाखवल्‍या नाहीत. त्‍यामुळे ‘मी चुकतोय’, हे मला कधी कळलेच नाही. आता मला कळले. माझ्‍या बोलण्‍यामुळे समोरचे दुखावले जातात. तेव्‍हा प्रत्‍येक आई- बाबांनी आपल्‍या मुलावर लहान वयातच योग्‍य संस्‍कार करून ‘त्‍याच्‍या वागण्‍यातले योग्‍य काय आणि अयोग्‍य काय आहे, हे मुलांना सांगणे किती आवश्‍यक आहे ?’, याचे गांभीर्य माझ्‍या लक्षात आले.’’ त्‍यानंतर काही दिवसांनी गावाहून आम्‍ही दोघे मुंबईला आल्‍यावर कृष्‍णत यांनी हळूहळू नामजप आणि सेवा करायला प्रारंभ केला आणि त्‍यांच्‍या स्‍वभावात आपोआप पालट होत गेले. त्‍यांच्‍या रागाचे प्रमाण ७० टक्‍के न्‍यून झाले आहे. ते मला माझी चूक शांतपणेच सांगतात. रागवत नाहीत. त्‍यांचे आई-बाबा तसेच त्‍यांच्‍या गावातील काही व्‍यक्‍ती म्‍हणतात, ‘‘लग्‍नानंतर त्‍यांच्‍यात पालट झाला आहे.’’

गुरुदेवा, केवळ आपल्‍याच कृपेमुळे स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी विशेष प्रयत्न न करताही कृष्‍णत यांच्‍यात इतक्‍या जलद गतीने झालेले पालट हा मला एक चमत्‍कारच वाटतो.

सौ. जया माने

१ इ. स्‍वावलंबन : ते एक वर्षाचे असतांनाच त्‍यांच्‍या आई वारल्‍या. त्‍यामुळे पुढे त्‍यांना स्‍वतःची सर्व कामे स्‍वतःच करण्‍याची सवय लागली. विवाहानंतरही पत्नी या नात्‍याने ‘मी त्‍यांची कामे करावी’, अशी त्‍यांची अपेक्षा नव्‍हती. ते स्‍वतःची कामे स्‍वतःच करतात.

१ ई. पत्नी साधना करत असल्‍याने तिच्‍याविषयी आदर असणे : आमच्‍याकडे अजूनही पुरुषप्रधान संस्‍कृती आहे. त्‍यामुळे स्‍त्रीला काही वेळा दुय्‍यम स्‍थान दिले जाते. त्‍यांना त्‍यांच्‍या मित्रांनी ‘तुझी पत्नी काय करते ?’ असे विचारल्‍यावर ते सांगतात, ‘ती इंजिनियर आहे; पण ती सनातन संस्‍थेची साधिका आहे. ही संस्‍था धर्मरक्षणाचे कार्य करते.’ अशी माझी आध्‍यात्मिक ओळख ते स्‍वतःच करून देतात.

१ उ. परिस्‍थिती स्‍वीकारणे : त्‍यांच्‍या आई लहानपणीच वारल्‍याने त्‍यांना त्‍यांच्‍या आयुष्‍यात अनेक संघर्षमय प्रसंगांचा सामना करावा लागला. ते सांगतात, ‘‘देवाने मला अनेक प्रसंगांतून अलगद बाहेर काढले आहे. देवानेच माझे रक्षण केले.’’ असा त्‍यांचा भाव आहे. त्‍यामुळे आताही ते प्रत्‍येक परिस्‍थितीत आनंदी असतात.

१ ऊ. ऐकण्‍याची वृत्ती असणे : सर्वसाधारणपणे समाजातील व्‍यक्‍तींना पत्नीचे ऐकणे, म्‍हणजे त्‍यांच्‍या मतांच्‍या (अहंच्‍या) विरुद्ध असल्‍यासारखे वाटते; पण कृष्‍णत यांच्‍या बाबतीत तसे नाही. त्‍यांना मी नामजप आणि प्रार्थना करायला सांगितल्‍यावर ते पटकन् ऐकतात. त्‍यांचा प्रत्‍येक निर्णय ते मला सांगतात. ‘काय योग्‍य आहे ?’, याचा विचार करून मगच ते निर्णय घेतात.

१ ए. प्रामाणिकपणा : कृष्‍णत नोकरी करतात. ते नोकरीवरून घरी आल्‍यावर मी त्‍यांना ‘‘नामजप केला का ?’’ किंवा ‘‘किती केला ?’’, हे विचारल्‍यावर ते जेवढा नामजप झाला, तेवढाच सांगतात. एखाद्या दिवशी नामजप झाला नाही, तर ‘आज नामजप झाला नाही’, असे ते प्रामाणिकपणे सांगतात.

१ ऐ. व्‍यवस्‍थितपणा : कृष्‍णत यांच्‍यात व्‍यवस्‍थितपणा हा गुण आहे. आमच्‍या घरी पाक्षिकाची (सनातन प्रभातच्‍या हिंदी पाक्षिकाच्‍या अंकांची) सेवा येते. त्‍यात अंकांच्‍या घड्या घालणे, पत्ते चिकटवणे आणि गठ्ठे बांधणे, या तीन सेवा ते परिपूर्ण करतात. एकाही अंकाची घडी वाकडी तिकडी नसते. त्‍यामुळे केंद्रातील साधक सांगतात, ‘‘दादांनी केलेल्‍या सेवेकडे (पाक्षिकांकडे) पाहिल्‍यावर मनाला खूप चांगले वाटते.’’

१ ओ. पत्नीला साधनेत साहाय्‍य करणे : कृष्‍णत यांना साधनेची विशेष काही माहिती नाही; पण ‘मी व्‍यवस्‍थित साधना करावी’, अशी त्‍यांची तळमळ असते. ते मला विचारतात, ‘‘नामजप केलास का ?’’ सेवा करतांना नामजपाची आठवण करून देणे, उदबत्ती लावणे, जयघोष करणे इत्‍यादी कृती करण्‍यासाठी ते स्‍वतःच मला आठवण करून देतात. त्‍यामुळे ‘ते यजमान नसून देवाने साधनेत साहाय्‍यासाठी दिलेले सहसाधकच आहेत’, असेच मला वाटते.

१ औ. ‘विवाह देवाच्‍या कृपेनेच झाला आहे’, असा भाव असणे : खरे पहाता समाजातील विवाह मुला-मुलींचे शिक्षण, संपत्ती, मुलांचे वेतन इत्‍यादी गोष्‍टी पाहून ठरवले जातात. प्रत्‍यक्षात मी अभियंता (इंजिनियर) आहे आणि कृष्‍णत यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ते म्‍हणतात, ‘‘तू मला होकार केवळ तुझ्‍या आई-बाबांनी, तुझ्‍या गुरूंनी केलेल्‍या संस्‍कारामुळे देऊ शकलीस. मला योग्‍य मार्ग दाखवण्‍यासाठी देवानेच आपला विवाह घडवून आणला.’’ गुरुदेव, लहानपणापासूनच मला आपण साधना शिकवली. आपणच माझ्‍यावर साधनेचे संस्‍कार केले. कृष्‍णत यांचा निर्व्‍यसनीपणा आणि त्‍यांच्‍या घरातील साधनेचे वातावरण (कृष्‍णत यांचे आई-वडील वारकरी संप्रदायाप्रमाणे साधना करतात.) यांमुळे मी या लग्‍नासाठी सिद्ध झाले; कारण मायेतील गोष्‍टींना महत्त्व नसून ‘साधना सर्वश्रेष्‍ठ आहे’, हे आपणच सांगितले आहेत. त्‍यामुळे साधनेला विरोध न करता साधनेत पदोपदी साहाय्‍य करणारा पती आपणच मला दिलात. ‘त्‍यांचा मला माझ्‍या साधनेसाठी लाभ करून घेता येऊ दे’, अशी आपल्‍या चरणी प्रार्थना आहे.

१ अं. सात्त्विकतेची आवड : कृष्‍णत यांना पाश्‍चात्त्य पद्धतीचे कपडे घातलेले आवडत नाहीत. ते मला आणि त्‍यांच्‍या बहिणीलासुद्धा ‘जीन्‍स’ सारखे पाश्‍चात्त्य पद्धतीचे कपडे घालू देत नाहीत. खरे पहाता त्‍यांना पाश्‍चात्त्य कपड्यांचा ‘आध्‍यात्मिकदृष्‍ट्या व्‍यक्‍तीवर कसा नकारात्‍मक परिणाम होतो ?’, हे ठाऊक नाही; पण ते म्‍हणतात, ‘प्रत्‍येक स्‍त्रीमध्‍ये शालीनता असायला पाहिजे. जीन्‍स घातल्‍याने शालीनता कुठेेच दिसत नाही. याउलट समाजाचा आपल्‍याकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोन बदलतो.’

१ क. सेवेची तळमळ : आमचे रामनाथी आश्रमात सेवेला जाण्‍याचे नियोजन झाले. आम्‍ही रामनाथी आश्रमात सेवेला जाण्‍याच्‍या २ दिवस आधी घरी पोस्‍टाच्‍या सेवेसाठी साप्‍ताहिक सनातन प्रभातचे ७०० अंक आले होते. नेहमी आम्‍हाला ही सेवा करण्‍यासाठी अनेक दिवसांचा कालावधी मिळतो; पण रामनाथी आश्रमात सेवेसाठी जायचे असल्‍याने कृष्‍णत यांनी त्‍या ७०० अंकांच्‍या घड्या करणे, त्‍यांना पत्ते चिकटवणे आणि प्रत्‍येक जिल्‍ह्याप्रमाणे गठ्ठे बांधणे, ही सेवा केवळ २ दिवसांमध्‍ये पूर्ण केली. सेवा करतांना ‘उरकण्‍याचा भाग’ किंवा ‘पाट्याटाकूपणा’ असा कुठेच नव्‍हता. प्रत्‍येक अंकाची घडी व्‍यवस्‍थितच होती. कृष्‍णत म्‍हणतात, ‘‘देवाची सेवा आहे ना, मग ती देवाला अपेक्षित अशी व्‍हायला पाहिजे.’’

त्‍या वेळी मला ‘परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे शिकायला मिळाले.

१ ख. गुरुदेवांप्रती भाव असणे : कृष्‍णत यांना ‘गुरुदेव विष्‍णुस्‍वरूप आहेत’, हे ठाऊक नाही; पण ‘ते ईश्‍वर आहेत’, असा त्‍यांचा भाव आहे. त्‍यामुळे गुरुदेवांविषयी बोलतांना ते ‘गुरुमाऊली’, ‘गुरुदेव’ किंवा ‘ते देव आहेत’, असाच उल्लेख करतात.

हे विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊली, आपल्‍याच कृपेने मला कृष्‍णत पती म्‍हणून लाभले आहेत. त्‍यांच्‍यातील गुण माझ्‍यातही येण्‍यासाठी आपणच माझ्‍याकडून प्रयत्न करवून घ्‍या. त्‍यांचा मला साधनेसाठी लाभ करून घेता यावा, अशी आपल्‍या कोमल चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

(गुरुदेवांची अपार कृपा आणि साधकांचा सहवास यांमुळे सर्वसाधारण व्‍यक्‍तीतही कसा पालट घडतो, हे आपल्‍याला श्री. कृष्‍णत यांच्‍या या गुणवैशिष्‍ट्यांवरून कळते. पत्नी साधिका असल्‍याने तिच्‍या सहवासामुळे आणि मूळातच साधकत्‍वाचे गुण अंगी असल्‍याने श्री. कृष्‍णत माने यांच्‍यात पालट झाले आहेत.’ – संकलक)

– सौ. जया कृष्‍णत माने, कोपरखैरणे, नवी मुंबई.  (१९.९.२०२२)