मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ बसला अपघात

१ ठार, १९ घायाळ

प्रतिकात्मक चित्र

रायगड, १७ सप्‍टेंबर (वार्ता.) – मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ रेपोली येथे १७ सप्‍टेंबरच्‍या पहाटे ४.३० वाजताच्‍या सुमारास राज्‍य परिवहन मंडळाची (एस्.टी.) बस आणि कंटेनर यांच्‍यात भीषण अपघात झाला. एस्.टी. बसने कंटेनरला मागून धडक दिल्‍याने झालेल्‍या अपघातात एस्.टी.मधील एका प्रवाशाचा मृत्‍यू झाला आहे, तर १९ प्रवासी घायाळ झाले आहेत. यांपैकी २ प्रवासी गंभीररित्‍या घायाळ झाले आहेत. घायाळांवर माणगाव येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात उपचार चालू आहेत. मुंबईहून राजापूरकडे निघालेल्‍या एस्.टी. बसला हा अपघात झाला आहे. गणेशोत्‍सवासाठी मुंबईहून नागरिक गावी निघाले होते. अपघातात बसच्‍या पुढच्‍या भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तात्‍काळ घटनास्‍थळी पोहोचले आणि बचावकार्य चालू केले. अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती; मात्र पोलिसांनी काही वेळातच वाहतूक सुरळीत केली.