असे आंदोलन का करावे लागते ?
पुणे – राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांची निवृत्तीनंतरची देय रक्कम न मिळाल्याने निवृत्त शिक्षक २ ऑक्टोबर या दिवशी पुण्यात राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची ग्रॅज्युएटी आणि देय रक्कम मिळावी, या मागणीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन होईल, अशी चेतावणी ‘महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघा’चे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी निवेदनातून दिली.
शिक्षकांची सेवानिवृत्ती नंतरची देय असलेली ग्रॅज्युएटीची रक्कम, ७ व्या वेतन आयोगानुसार असलेली तफावत राज्य सरकारने अद्याप दिलेली नाही. गेल्या वर्षभरापासून शासन आर्थिक तरतूद उपलब्ध करून देत नाही; पण खासगी अनुदानित शिक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी यांना मात्र सेवानिवृत्तीनंतर तात्काळ ही रक्कम दिली जाते. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांची देय रक्कम राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत न दिल्यास २ ऑक्टोबर या दिवशी राज्यातील अनुमाने दीड सहस्र सेवानिवृत्त शिक्षक आंदोलन करतील, असे शिवानंद भरले यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका :शिक्षकांना सेवानिवृत्ती नंतरची रक्कम मिळण्यासाठी आंदोलन करायला लावणारे जनताद्रोही प्रशासन ! |