पुणे – येथील दळवीवाडी येथे असलेल्या कै. इंदुमती दळवी महापालिका शाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ३५१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्येअन्वये या शाळेत ११ शिक्षकांची आवश्यकता आहे; मात्र प्रत्यक्षात ५ शिक्षक शाळेमध्ये शिकवत आहेत. एका वर्गात १०० हून अधिक विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. शिक्षक नसल्याने २ ते ३ तुकड्यांमधील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात दाटीवाटीने बसवून शिकवण्याची कसरत शिक्षकांना करावी लागत आहे. शाळेत आवश्यक शिक्षक नियुक्त न केल्यास शाळेला टाळे लावून सत्याग्रह करण्याची चेतावणी ‘सिंहगड विकास समिती’चे कार्याध्यक्ष इंद्रजित दळवी यांनी दिली आहे.
१. माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे आणि स्थानिक पालक शाळेत पुरेसे शिक्षक नियुक्त करावेत, यासाठी पाठपुरावा करत आहेत; मात्र अद्यापही शिक्षक नियुक्त केलेले नाहीत.
२. कामगारांची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे; मात्र शिक्षक अल्प असल्याने पायाभूत शिक्षण अवघड झाले आहे, असे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अनिल लोले यांनी सांगितले.
३. ‘या शाळेत शिक्षक न्यून असल्याच्या अनेक तक्रारी आल्या असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हानी होऊ नये, यासाठी शाळेत तातडीने पुरेसे शिक्षक नियुक्त केले जातील’, असे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी सांगितले.
४. प्रशासनाकडे सातत्याने मागण्या करूनही शिक्षक मिळत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संपादकीय भूमिका :ग्रामीण भागात शिक्षणाची भीषण अवस्था असणे दुर्दैवी ! सर्वत्रच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, याविषयी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक ! |