मनोज जरांगे पाटील यांचा उपचार आणि पाणी घेण्यास नकार !

आणखी २ मास घ्या; पण आरक्षण द्या ! – आमरण उपोषणावर मनोज जरांगे ठाम

उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील

जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा १० सप्टेंबर हा १३ वा दिवस आहे. आजपासून त्यांनी उपचार आणि पाणी घेण्यास नकार दिला असून ते आमरण उपोषणावर ठाम आहेत. सरकार वेळोवेळी वेळ मागून घेत आहे. त्यामुळे आणखी २ मास घ्या; पण आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता पुढील दिशा म्हणजेच ‘आमरण उपोषण’ चालू केले आहे. सरकारला कालपर्यंत दिलेला वेळ आता संपला आहे. याचा अर्थ असा नाही की, सरकारने प्रयत्न केले नाहीत. त्यांनी प्रयत्न केले; पण त्यांनी काढलेल्या अध्यादेशामध्ये चुका झाल्या. त्यामुळे यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच पालट करतील. पुढील दिशा ठरवण्यासाठी आम्ही आमच्या लोकांची आज बैठक घेत आहोत.