रोगापेक्षा इलाज भयंकर !

‘गोव्यात ‘रेड लाईट एरिया’ (वेश्याव्यवसाय चालणारा परिसर) नसल्या कारणानेच लहान मुलींचे लैंगिक शोषण होत असून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. ज्यांना स्वतःला संतुष्ट करायचे आहे, ते आमच्या मुलींवर आक्रमण करण्यापेक्षा तिथे जाऊन स्वतःचे समाधान करू शकतात’, असा सल्ला देऊन ‘राज्यातील लैंगिक गुन्ह्यांची संख्या अल्प करण्यासाठी गोव्याला ‘बाजार’ आवश्यक असल्या’चे मत, सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी नुकतेच व्यक्त केले. एका शाळेतील कथित विनयभंगाच्या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना केरकर यांनी हे मत व्यक्त केले. अशी मागणी करणे म्हणजे समाजाला अनैतिक बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासारखे नाही का ? ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ यातीलच हा प्रकार आहे. वेश्याव्यवसाय चालू ठेवल्याने लैंगिक गुन्हे थांबतील, याची केरकरबाईंना निश्चिती आहे का ? त्यासाठी हे गुन्हे घडण्यास कारणीभूत असणार्‍या मूळ गोष्टींचा शोध घेऊन त्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. अश्लील ध्वनीचित्रफीती (पॉर्न व्हिडिओ) बलात्काराला सर्वाधिक कारणीभूत असतात. टी.व्ही., चित्रपटांतील अश्लील दृश्ये, अश्लील संकेतस्थळे हे सर्व भ्रमणभाषवर सहज उपलब्ध होत असल्यामुळे लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. चित्रपटांत उघडपणे व्यक्त होणारी अश्लीलता, अत्यंत तोकडे किंवा असून नसल्यासारखे कपडे, अश्लील संवाद आणि दृश्ये, विकृत नृत्ये, मादक संगीत, उत्तान  ‘आयटम साँग’ या विकृती समाजात वासनांधता वाढण्यास कारणीभूत आहे. सर्वच स्तरांवरील अश्लीलता निर्माण आणि प्रसारित करणार्‍यांना कडक शासन झाले, तर मुळावर घाव घातला जाणार आहे.

चित्रपटातील अभिनेत्रींप्रमाणे अनुकरण करणारे तोकडे किंवा अयोग्य पेहराव परिधान करणे आणि समाजाची खालावलेली नैतिकता महिलांवरील अत्याचारांना कारणीभूत आहे. बलात्कार्‍यांना शिक्षा न होणे किंवा विलंबाने होणे, हेही अत्याचारांना कारणीभूत असणारे कारण आहे. असे असतांना लैंगिक गुन्हे टाळण्यासाठी वेश्यावस्ती निर्माण करण्याचा पर्याय देणे किती भयंकर आहे ? असे सुचवणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत कि समाजद्रोही ? भारतीय समाजाचे मूळ असणारी विवाह आणि कुटुंब संस्था यांवरील हा आघात नव्हे का ? ‘परस्त्री मातेसमान’ मानणारी आपली संस्कृती आहे. धर्माचरण करणारा समाज निर्माण करण्याचे दायित्व न घेता, समाज उद्ध्वस्त करणार्‍या उपाययोजना सुचवणार्‍यांना जागृत समाजाने विरोध केला पाहिजे !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे.