स्थैर्य आणि मनःशांती प्रदान करणारे श्री गणपति अथर्वशीर्ष !

१. ‘अथर्वशीर्ष’ ही उपाधी लावण्यामागील कारण !

‘अथर्वशीर्ष हे अथर्ववेदाच्या ‘शीर्ष’ ग्रंथातील आहे. नृसिंहतापिनी उपनिषदाच्या भाष्यग्रंथात अथर्वशीर्ष आणि तापिनी ग्रंथ संपदा उपनिषद साहित्याचा उपविभाग मानले आहे. ‘अथर्व’ शब्दाच्या अर्थाचा विचार करता ‘थर्व’ म्हणजे जाणे किंवा चालणे असा होतो. याचा ‘अ’ लावल्याने निषेध झाला आणि अथर्व म्हणजे शांती, स्थिरता, स्थैर्य अन् अचंचलता असा होतो. ‘शीर्ष’चा शब्दश: अर्थ विचारात घेतल्यास ‘अंत’ असा होतो. हे अथर्ववेदाच्या अंती असल्याने याचा अर्थ अथर्ववेदाचा अंतिम भाग असा होतो. इतर वेदांना शीर्ष साहित्य आढळत नसल्याने शीर्ष साहित्याला ‘अथर्वशीर्ष’ उपाधी दिली गेली.

२. मानवी मनाची चंचलता दूर करणारे अथर्वशीर्ष !

मानवी मन हे अतिशय चंचल आहे. ते स्थिर असणे आवश्यक आहे. ते चंचलत्व दूर करण्यासाठी योगशास्त्र आणि अथर्वशीर्ष यांचा चांगला उपयोग होतो. चंचलता दूर करण्याचा एक मार्ग ‘अथर्व’ या शब्दातून प्रगत होतो. ‘शीर्ष’ या शब्दाचा दुसरा अर्थ ‘डोके’ असाही होतो. ‘डोके शांत आणि मन स्थिर होणे यांसाठी अथर्वशीर्षाचा चांगला उपयोग होतो’, असे अनेकांचे अनुभव आहेत. ग्रंथातसुद्धा ‘स्थिर बुद्धी आणि स्थिर मन यांसाठी अथर्वशीर्ष जप करावा’, असे सांगतले आहे.

संसारात अनेक ताप निर्माण होतात आणि डोके गरगरते. मनःशांती नष्ट होते. असे अनेक प्रकार घडतच असतात. ते नाहीसे व्हावेत किंवा दूर व्हावेत, यासाठी श्री गणेश अथर्वशीर्ष हा उत्तम उपाय आहे. जो कुणी श्रद्धेने त्याची आवर्तने करेल, त्याला हे फळ मिळते.

३. श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणण्याची योग्य पद्धत !

एकाने सांगितले, ‘मी गेली २० – २५ वर्षे गणेश अथर्वशीर्ष म्हणत आहे; परंतु परिणाम काही नाही.’’ मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही कसे म्हणता ?’’ ते म्हणाले, ‘‘आंघोळीला गेल्यावर पहिला एक तांब्या पाणी डोक्यावर घेतले की, म्हणण्यास आरंभ करतो. कपडे घालेपर्यंत सर्व म्हणून पूर्ण होते.’’ अशा प्रकारच्या म्हणण्याने आयुष्यभर म्हणूनही फळ मिळू शकत नाही. मी त्यांना सांगितले, ‘‘स्नानानंतर धूतवस्त्र परिधान करून गणेशाच्या प्रतिमेसमोर मांडी घालून बसा आणि शांतपणे प्रतिदिन १ पाठ केला, तरी गणेशकृपा होईल.’’ १ वर्षानंतर त्यांचे पत्र आले. त्यात त्यांनी अत्यंत समाधानी आणि सुखी होत असल्याचे कळवले. मंत्र किंवा स्तोत्र कसेही म्हणून चालत नाही. त्याच्या पद्धतीप्रमाणे आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने सेवा केल्यास श्री गणेश आपले हित करतो आणि त्याच्या भक्तीस आपण पात्र ठरतो.’

– श्री. विद्याधरशास्त्री करंदीकर (साभार : ‘नवशक्ति’, (श्री गणेश विशेषांक) ३.९.२००८)