वास्तू आनंददायी होण्यासाठी सदनिकांमध्ये (फ्लॅटपद्धतीत) वास्तूशास्त्राचा उपयोग कसा करावा ?

प्रत्येकालाच काही नवीन घर बांधण्याची संधी मिळत नाही. विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या व्यावसायिक शहरांमध्ये आता अधिक प्रमाणात सदनिकाच आढळतात. अशा वेळी ‘सदनिकेमध्ये वास्तूशास्त्राचा उपयोग कसा करावा ?’, यांविषयीची माहिती येथे देत आहोत. ९ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘चुकीच्या समजुतीनुसार नवीन घर बांधतांनाच वास्तूशास्त्राचा वापर करावा, पूर्व दिशेचा किंवा उत्तर दिशेचा दरवाजा असणार्‍या सदनिका घ्याव्यात आणि सदनिकेमध्ये वास्तूशास्त्राच्या नियमानुसार पालट केल्यास अडचणी सुटू शकतात’, यांविषयी माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/718472.html

७. शास्त्रानुसार सांगितलेली दिशा मोकळी हवी !

वास्तूशास्त्राच्या दृष्टीकोनातून जी दिशा सर्वांत चांगली असते की, जी मोकळी असायला पाहिजे. जिच्यामुळे व्यक्तीची प्रगती अधिक घडू शकते, ती दिशा ‘इंटिरिअर डिझाइनर’ नेहमी बंद करून ठेवतात. त्याच बाजूला अधिकाधिक कपाटे (वॉर्डरोब)  करून ठेवतात आणि जी दिशा मोकळी रिकामी ठेवावयास नको, तीच दिशा नेमकी मोकळी ठेवतात. त्यामुळे त्या घरात अडचणी आणि कटकटी आपोआप निर्माण होतात. त्यांचा या शास्त्राचा अभ्यास नाही किंवा त्यांना याविषयीची माहिती नाही; म्हणून हे घडते आणि पैसे खर्च करूनही आपल्यालाच त्याचा त्रास होतो.

त्यामुळे ‘इंटिरिअर डेकोरेशन’ करून घेण्याअगोदर त्या व्यक्तीला स्पष्ट सांगावे की, आम्हाला वास्तूशास्त्राच्या नियमांना अनुसरून सदनिका सजवायची आहे. तुम्हाला त्याची माहिती नसेल, तर जाणकाराला विचारून त्याप्रमाणे सदनिका सजवा.

८. वास्तुदेवता आणि वास्तूशास्त्र 

‘ही वास्तुदेवता किंवा वास्तुपुरुष घरामध्ये नेहमी शांतता, सुबत्ता आणि प्रगती व्हावी’, याकरता स्थापन केलेला असतो. वास्तुपुरुष हा नेहमी भूमीमध्येच पुरायचा असतो आणि त्याचे ते स्थान हे आग्नेय कोपर्‍यातच असते, अन्य कुठेही नाही.

वास्तुपुरुषाची तांब्याची अथवा सोन्याची प्रतिमा करून ती नेहमी उलटीच ठेवायची असते, म्हणजे पालथाच ठेवावा लागतो. त्याचे मस्तक हे ईशान्य दिशेकडेच करावयाचे असते. प्रतिमा अभिमंत्रित करून त्यावर गंध, फुले, पाणी इत्यादी अर्पित करून मंत्रोच्चाराने वास्तूमधील चैतन्यात सजीवता निर्माण करतात. आग्नेय कोपर्‍यात वास्तूनिक्षेप केल्यानंतर ती जागा पूर्णपणे बंद करायची असते, झाकायची असते. ती पुन्हा कधीही उघडायची नसते. त्या वास्तुदेवतेचे पावित्र्य कायम राखायचे असते. त्यावर पाय देणे आणि केरकचरा कधीही ठेवायचा नसतो. ‘वास्तूदेवतेची वर्षातून एकदा तरी पूजा करावी’, असे आहे. घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्य होते, तेव्हासुद्धा त्याची पूजा करणे लाभदायक मानले आहे.

९. नवीन घरातही वास्तुपूजन हवे ! 

‘स्वतंत्र इमारत, बंगला बांधतांनाच केवळ वास्तुपूजन करायचे असते’, ही कल्पना योग्य नाही. नवीन सदनिकेमध्येसुद्धा वास्तुपूजन करावे; कारण आपली सदनिका हीच केवळ आपली वास्तू असते.

१०. वास्तुपूजनाची जागा व्यवस्थित करून ठेवा ! 

सदनिकेमध्ये खोलीतील आग्नेय कोपर्‍यात एक ६ इंच X ६ इंच लांबी-रूंदीची लादी काढून ४ इंच खोल जागा करून ती सिमेंटने चोहोबाजूंनी लिंपित करून घ्यावी. नंतर वास्तुनिक्षेप ब्राह्मण सांगतील, त्याप्रमाणे करून पूजन झाल्यावर त्याच्या वरून लादी पुन्हा घट्ट बसवावी. ही अतिशय सहजसोपी गोष्ट आहे. त्यामुळे खरेखुरे वास्तुपूजन आणि वास्तुनिक्षेप होतो. प्रत्येक व्यक्तीला हे करणे शक्य आहे. वास्तुपूजनाच्या दिवशी अशी जागा सिद्ध करणे कठीण होते, वेळ मिळत नाही. हातोडी-छिन्नी मिळत नाही, खड्डा सिद्ध करायला वेळ लागतो. त्यामुळे वास्तुपूजनाचे आदल्या दिवशी ही जागा व्यवस्थित करून ठेवावी, म्हणजे दुसर्‍या दिवशी ब्राह्मणांनाही त्रास होत नाही.

११. पुरोहितांनी यजमानास पूजेची सर्व माहिती देणे 

पुरोहितांस आपण वास्तुपूजनासंबंधी सांगतो, तेव्हा त्यांचे हे काम आहे की, ‘यजमानाला असा खड्डा करून ठेवा’, असे सांगणे. यजमानास अशी माहिती देणे, हे त्यांचे कर्तव्य आहे.

अनुभव असा आहे की, असे कुणीही करत नाही आणि मग वास्तुनिक्षेप प्रत्यक्षात होतच नाही. ‘वास्तुपूजन केले’, हे केवळ मानसिक समाधान मिळते. त्यातून कोणताही लाभ होत नाही; मात्र त्रास नक्की होतो. त्यापेक्षा एखाद्या व्यक्तीने वास्तुपूजन नाही केले, तरी एक वेळ चालेल; परंतु ‘वास्तु प्रतिमा अभिमंत्रित केल्यानंतर प्रतिमेमध्ये चैतन्यता आणि सजीवता ओतल्यानंतर तिचा निक्षेप न करता उघड्यावर ठेवणे’, हे अतिशय निषिद्ध आहे. ते त्रासदायक ठरते.

१२. पुरोहितांनी कधीही शास्त्रविरोधी कृती यजमानास करण्यास सांगू नये !

सर्वांत दुर्दैवाची आणि चिंतेची गोष्ट ही आहे, ‘आजकाल ब्राह्मणवर्ग, म्हणजे पुरोहित या वास्तुनिक्षेपाकडे अजिबात लक्ष देत नाहीत. बरेच वेळा वास्तू मुहूर्त नसतांनाही त्यांना ज्या दिवशी वेळ असतो, त्या दिवशी वास्तुपूजन उरकतात. वास्तुपूजनाचा मुहूर्त प्रत्येक पंचांगात स्पष्टपणे दिलेला असतो, त्याच दिवशी नेहमी वास्तुपूजन करावे. याखेरीज या लेखात सांगितल्याप्रमाणेच वास्तुनिक्षेप झाला पाहिजे’, हेही स्पष्ट सत्य आहे; परंतु बरेच ठिकाणी वास्तुप्रतिमा देवघरात डबीत झाकून ठेवायला सांगतात अथवा नुसती देवघरात उघडी ठेवायला सांगितले जाते. ही गोष्ट अत्यंत गर्हणीय (तिरस्करणीय) आणि निखालस चुकीची आहे. ज्या ठिकाणी पुरोहित असे सांगतात, त्यांना त्याची वाईट फळे भोगावी लागतातच; परंतु बिचार्‍या यजमानालाही त्याचा त्रास भोगावा लागतो. यजमान ‘पुरोहित सांगतील ते सत्य’, असे धरून चालतो.

१३. पुरलेली वास्तुप्रतिमा हलवू नका ! 

कोणत्याही जुन्या ग्रंथामध्ये वास्तुप्रतिमा डबीत, डब्यात अथवा उघडी ठेवायला सांगितलेली नाही. पुरलेली वास्तुप्रतिमा कधीही हलवायची अथवा काढायची नसते. डबीत ठेवलेली वास्तुप्रतिमा प्रतिदिन हलवली जाते. एवढेच नव्हे, तर देवघर चुकीच्या दिशेस असेल, तर ते योग्य दिशेस ठेवतांना साहजिकच डबीतील वास्तुप्रतिमा पुन्हा दिशेनुरूप हलवली जाते. याचाच अर्थ सर्वच चुकीचे होत जाते.

एका व्यक्तीने सांगितले, ‘‘पुरोहित त्याला म्हणाले, ‘‘तुमच्याकडून नियम पाळणे इत्यादी काही होणार नाही आणि मग वास्तुप्रतिमेचा रोष ओढवून घ्याल आणि पुष्कळ त्रास होईल. माझ्याकडे निदान व्यवस्थित तरी होईल; म्हणून मीही वास्तुप्रतिमा (सोन्याची करवून घेतलेली) माझ्या घरी घेऊन जातो.’’

त्यामुळे असे निंद्य प्रकार कुणीही करू नका. ‘भिक्षुक आणि गुरुजी यांच्याविषयी अधिकाधिक आदर कसा वाढेल ? मानसन्मानाने कसे वागवले जाईल ?’, याविषयी सतर्क रहा. ईश्वर तुम्हालाही भरभरून देईल.’

(समाप्त)

– श्री. अरविंद वझे

(साभार : आध्यात्मिक ‘ॐ चैतन्य’ डिसेंबर २००१)