१. चुकीच्या समजुतीनुसार नवीन घर बांधतांनाच वास्तूशास्त्राचा वापर करावा !
‘बहुतेकांची अशी समजूत आहे, ‘आपल्याला नवीन घर बांधायचे असेल, तेव्हाच वास्तूशास्त्राचा उपयोग आहे, अन्यथा नाही.’ ही समजूत पूर्णतः चुकीची आहे. नवीन घर बांधायच्या वेळी वास्तूशास्त्रातील नियमांचा वापर केला, तर फारच चांगले ! त्यामुळे सर्वच गोष्टी व्यवस्थित करता येतात आणि या शास्त्राचे लाभ नक्कीच मिळतात; परंतु प्रत्येकालाच काही नवीन घर बांधण्याची संधी मिळत नाही. विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या व्यावसायिक शहरांमध्ये आता अधिक प्रमाणात सदनिकाच आढळतात. लोक जागा (प्लॉट) घेऊन बांधकाम करण्यापेक्षा बांधलेल्या इमारतीत सदनिका (फ्लॅट) विकत घेणेच अधिक पसंत करतात.
२. पूर्व दिशेचा किंवा उत्तर दिशेचा दरवाजा असणार्या सदनिका घ्याव्यात !
सदनिकेमध्येही वास्तूशास्त्राचा उपयोग करून रचनेत तो पालट करून लाभ मिळवता येतात. यामध्येही दोन भाग आहेत. एक म्हणजे पूर्णतः नवीन सदनिका घेणे. अशा पद्धतीने सदनिका घेतांना अथवा आरक्षित करतांना आपण नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेचा दरवाजा असेल, अशीच सदनिका आरक्षित करावी किंवा घ्यावी, म्हणजे सामान्यतः अशा जागेत अडचणी अल्प असतात किंवा अडचणी आल्या, तरी त्यांचे निराकरण लवकर होते. अधिक त्रास होत नाही अथवा त्याची तीव्रता अधिक जाणवत नाही.
३. सदनिकेमध्ये वास्तूशास्त्राच्या नियमानुसार पालट केल्यास अडचणी सुटू शकतात !
दक्षिण, दक्षिण-पश्चिमेचा दरवाजा असलेल्या सदनिकेमध्ये अडचणी नक्कीच येतात आणि त्यांचे निराकरण करतांना अधिक त्रास होतो. काही वेळा अडचणी सोडवतांना जीव नकोसा होतो; परंतु आपण रहात असलेल्या सदनिकेमध्येही वास्तूशास्त्राच्या नियमानुसार पालट केले किंवा रचना केली, तरीसुद्धा परिस्थितीत निश्चितपणे पुष्कळ पालट घडू शकतो. असे पालट करतांना सोयीसुविधा या भागाला थोडीशी मुरड घालावी लागते.
अस्तित्वात असलेल्या सदनिकेमध्ये जर अधिक नकारात्मक परिणाम देणारी रचना असेल, तर त्यामध्ये पालट केल्यानंतर लाभ नक्कीच होतो. यामध्ये अधिक तोडफोड, मोडतोड किंवा खर्च करावा लागत नाही. ज्यांनी या वास्तूशास्त्राचा सखोल अभ्यास केलेला आहे, ते निरनिराळे उपाय व्यवस्थित सुचवू शकतात.
४. ‘सदनिकेची रचना कुटुंबाला किती लाभदायक आहे ?’, याचा विचार करणे आवश्यक !
काही सदनिकांमध्ये काही रचना पालटता येणे शक्य नसते, अशा वेळी त्याला उपाय असतो की, ज्यामुळे त्रास नक्की अल्प होऊ शकतो. आपले घर, म्हणजेच सदनिका त्यातील स्पंदनांमुळे त्या घरात २४ घंटे रहाणार्या व्यक्तींवर परिणाम करणारी असते. त्यामुळे त्या ‘सदनिकेची रचना आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला किती लाभदायक आहे ?’, याचा विचार करणे, हे प्रथम. ‘दुसर्याला किंवा घरात येणार्या पाहुण्यांना आपल्या सदनिकेमधील रचना कशी चांगली दिसेल ?’, हा विचार कधीही करू नये. ‘चांगली रचना दिसणे, याला वास्तूशास्त्रात महत्त्व अल्प असून घरात केलेली अंतर्गत रचना आपल्या कुटुंबियांच्या प्रगतीला किती पोषक किंवा लाभदायक आहे ?’, याचाच विचार करणे आवश्यक आहे.
५. चुकीच्या दिशेस दरवाजा असल्यास काय कराल ?
सर्वांनाच सदनिकेच्या पूर्वेचा किंवा उत्तर दिशेचा दरवाजा मिळणे अशक्य असते. अशा वेळी कित्येकांना दक्षिणेचा, पश्चिमेचा, नैऋत्येचाही दरवाजा मिळतो. असे झाले किंवा असले, तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, म्हणजे जर रहात्या जागेत ७० – ८० टक्के नकारात्मक स्पंदने असतील, तर घरातील रचना वास्तूशास्त्रानुसार पालट केल्यामुळे २० ते ३० टक्क्यांपर्यंत अल्प होऊ शकतात. होत असणारा त्रास सुसह्य होऊ शकतो. अडचणी सर्वांनाच येत असतात; पण ‘येणार्या अडचणींवर कशा पद्धतीने आपण शांतपणे मात करू शकतो ?’, हे कळू शकते आणि त्याप्रमाणे घडते. वास्तूशास्त्रावर आधारित रचना केल्यामुळे १०० टक्के हानी होत नाही; परंतु केवळ लाभ आणि लाभच होतो, हे निश्चित !
६. ‘इंटिरिअर डेकोरेशन’मध्ये केवळ चांगले दिसण्यावर भर दिलेला असल्याने बर्याचदा ते वास्तूशास्त्राच्या विरोधी केलेले असणे
‘प्रत्येक व्यक्तीला आपली सदनिका किंवा घर छान सजवावे’, असे वाटते. त्यात गैर काहीही नाही. विशेषतः उच्च मध्यम वर्गीय लोकांमध्ये ‘इंटिरिअर डिझायनर’ला बोलावून सदनिका (ब्लॉक) छान करून घेण्याची प्रवृत्ती अधिक असते. त्याकरता ते २ – ३ लाख रुपयेही व्यय करतात. विशेषतः नवीन सदनिका (ब्लॉक) घेतल्यानंतर गृहप्रवेश करण्याअगोदर ‘इंटिरिअर डेकोरेशन’ करून घेण्याची प्रथाच पडत चाललेली आहे. तेही अर्थात् चुकीचे नाही; कारण एकदा रहायला गेल्यानंतर मग पुन्हा रंगरंगोटी, ‘फर्निचर’ इत्यादी गोष्टी लोकांना नको असतात; परंतु ‘इंटिरिअर डेकोरेशन’ करणार्या व्यक्तीला वास्तूशास्त्राची माहिती असतेच, असे नाही. तिचा कल हा नेहमी ‘सदनिकेमधील रंगसंगती, ‘फर्निचर’ इत्यादी सजावट अधिकाधिक चांगली कशी दिसेल ?’, यावर असतो. त्यांच्यामध्ये कलात्मकताही चांगली असते; परंतु माझ्या आजवरच्या अनुभवावरून सांगतो की, ते जे ‘इंटिरिअर डेकोरेशन’ करतात, ते नेमके वास्तूशास्त्राच्या नियमांविरुद्ध असते. ‘चांगले दिसणे’, हा एकच प्रमुख गुण; परंतु ‘घरातील लोकांना त्याची उपयुक्तता किंवा लाभदायक किती आहे ? त्यामुळे त्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतील का ?’, हा त्यांचा विचार नसतो.
– श्री. अरविंद वझे
(क्रमशः)
भाग २ : https://sanatanprabhat.org/marathi/718928.html
(साभार : आध्यात्मिक ‘ॐ चैतन्य’, डिसेंबर २००१)